विनायक मेटेंचा अपघात की घातपात? व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे संशय बळावला | पुढारी

विनायक मेटेंचा अपघात की घातपात? व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे संशय बळावला

बीड, पुढारी वृत्तसेवा : मुंबई- पुर्ण द्रुतगती मार्गावर रविवारी (दि.14) शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या गाडीला झालेल्या अपघाताबाबत उलट-सुलट चर्चा होत असतानाच आता एका कार्यकर्त्याच्या व्हायरल ऑडीओ क्‍लिपमुळे अपघात की घातपात? या बाबत संशय बळावला आहे. अण्णासाहेब वायकर या कार्यकर्त्याने 3 ऑगस्ट रोजी मेटे याच्या गाडीत असताना पुण्याजवळ दोन वाहनांनी पाठलाग केल्याचा दावा केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून, विनायक मेटे त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

रविवारी (दि.14) पहाटे मुंबईकडे जात असताना विनायक मेटे यांच्‍या  गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघाताबाबत उलट- सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असताना अण्णासाहेब वायकर या कार्यकर्त्याची ऑडीओ क्‍लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

 दोन किलोमीटरपर्यंत दोन गाड्यांनी पाठलाग केला

शिवसंग्रामचे कार्यकर्ते असलेले अण्णासाहेब वायकर हे 3 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांच्या सोबत त्यांच्या गाडीतून पुणे येथे जात होते. यावेळी दोन किलोमीटरपर्यंत दोन गाड्यांनी पाठलाग केला.  मेटे यांच्या गाडीला अपघात व्हावा, या पध्दतीने ते गाडी चालवत होते. याकडे वायकर यांनी मेटे यांचे लक्ष वेधले. मात्र त्यांनी ‘जाऊ दे ते खूप दारु पिले आहेत’, असे म्हणत या प्रकाराकडे दुर्लक्ष केले, असा दावा अण्णासाहेब वायकर यांनी ऑडीओ क्‍लिपमध्ये केला आहे. पुणेनजीक शिक्रापूरजवळ हा प्रकार घडल्याचे त्‍यांनी म्‍हटलं आहे . वायकर हे एका स्थानिक पत्रकाराशी बोलतानाची ही ऑडिओ क्लिप आहे.

निष्पक्ष चौकशी व्हायला हवी : ज्योती मेटे

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे माध्यमांशी बोलताना म्‍हणाल्‍या की, “मी  व्‍हायरल झालेली ऑडिओ क्लिप ऐकली आहे. अण्णासाहेब वायकर यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. चालकाने अपघातानंतर फोन का केला नाही? याबाबत शंका वाटते, असे म्हणत ज्योती मेटे यांनी या अपघाताची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा

Back to top button