Shahbaz Ahmed : इंजिनियर ते क्रिकेटर कसा बनला शाहबाज अहमद? त्याचा प्रवास पाहून 'थ्री इडियट्स'ची होईल आठवण | पुढारी

Shahbaz Ahmed : इंजिनियर ते क्रिकेटर कसा बनला शाहबाज अहमद? त्याचा प्रवास पाहून 'थ्री इडियट्स'ची होईल आठवण

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अष्टपैलू शाहबाज अहमदचा (Shahbaz Ahmed) झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात समावेश केला आहे. जखमी वॉशिंग्टन सुंदरच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये कौंटी स्पर्धेत खेळताना सुंदरला खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याचा झिम्बाब्वे दौऱ्यावर सस्पेन्स कायम होता. आता सुंदरला झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून वगळण्यात आल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाकडून खेळणाऱ्या शाहबाजला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

शाहबाजचे आयुष्य थ्री इडियट्समधील फरहान कुरेशीशी मिळतेजुळते

तुम्ही थ्री इडियट्स हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला त्यातली अभिनेता आर माधवन याने साकारलेले फरहान कुरेशी हे पात्र आठवयतं का? आठवत नसेल तर सांगतो की, फरहान हा रँचो (अमिर खान) आणि राजू रस्तोगी (शर्मन जोशी) यांचा मित्र असतो. खरंतर फरहानला वाईल्ड फोटोग्राफर बनायचे असते. पण वडिलांच्या दबावामुळे त्याला इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यावा लागतो. सरतेशेवटी कसाबसा तो इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करतो, पण त्यानंतर नोकरी करण्याचे त्याच्या मनात नसते. अखेर रँचो त्याचे मन परिवर्तन करून त्याच्या मनात काय आहे ते बनण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यानंतर फरहानही वडिलांना ठामपणे मी वाईल्ड फोटोग्राफर बनणार असल्याचे पटवून देतो. अखेर वडीलही त्याच्या कल्पकतेला मान्यता देत तुला काय बनायचे ते तू कर असे सांगतात. आता तुम्ही विचार करत असाल की इथे आम्ही तुम्हाला थ्री इडियट्सची कथा का सांगत आहोत? वास्तविक, या कथेतील फरहानचा भाग भारतीय क्रिकेट संघाशी जोडला जात आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात असा एक दमदार अष्टपैलू खेळाडू सामील झाला आहे, ज्याचे आयुष्य थ्री इडियट्सच्या फरहान कुरेशीशी मिळतेजुळते आहे.

ही कहाणी आहे आरसीबीच्या शाहबाज अहमदची, ज्याने वडिलांच्या आग्रहाखातर इंजिनीअरिंग केले, पण शेवटी मनाचे ऐकले आणि तो क्रिकेटर बनला. अभियंता ते क्रिकेटर असा प्रवास शाहबाजचा कसा झाला, आपण पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये…

शाहबाज (Shahbaz Ahmed) 2020 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून खेळत आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील कठोर परिश्रम आणि आयपीएलमधील काही उत्कृष्ट कामगिरींच्या जोरावर टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. 27 वर्षीय शाहबाज अहमद हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने देशांतर्गत स्तरावर आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये अनेकदा प्रभावी कामगिरी केली. लिस्ट-ए मध्ये शाहबाजची फलंदाजीची सरासरी 47.28 आहे, तर गोलंदाजीची सरासरी 39.20 आहे. 2020 मध्ये आरसीबी संघात सामील झाल्यापासून शाहबाजने फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे.

शाहबाजने (Shahbaz Ahmed) आयपीएलमध्ये 29 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 18.6 च्या सरासरीने आणि 118.72 च्या स्ट्राईक रेटने 279 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर शाहबाजने गोलंदाजीत 13 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 8.58 आहे. त्याचबरोबर सात धावांत तीन बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. आयपीएल 2022 मध्ये शाहबाजने महत्त्वपूर्ण खेळी खेळून आपले नाव चमकवले. या वर्षी 5 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध आरसीबीच्या विजयात शाहबाजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने 26 चेंडूत 45 फटकावल्या होत्या. यादरम्यान त्याने चार चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 173.08 होता.

वडीलांनी नोकरीसाठी सोडले गाव

हरियाणाच्या मेवात जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शाहबाजची (Shahbaz Ahmed) क्रिकेटपर्यंत पोहोचण्याची कहाणी रंजक आहे. आरसीबीच्या या अष्टपैलू खेळाडूचे वडील अहमद जान हे हरियाणातील एसडीएमचे रीडर आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी त्यांनी गाव सोडलं होतं. मुलगा शाहबाजने इंजिनीअर व्हावे हे त्यांचे स्वप्न होते, पण घडले वेगळेच. शाहबाजला क्रिकेटची आवड होती आणि त्याने ते निवडले.

शाहबाजचे आजोबाही क्रिकेट खेळायचे

शाहबाजच्या रक्तात क्रिकेट आजोबांकडून आले. अहमद जान यांचे वडील क्रिकेटचे शौकीन होते. मेवातमध्ये क्रिकेटसाठी फारशा सुविधा नव्हत्या. त्यांचे गाव त्यांच्या शिक्षणासाठी ओळखले जाते. त्यात डॉक्टर आणि इंजिनिअर्सची संख्या जास्त आहे. शाहबाजची धाकटी बहीण फरहीनही डॉक्टर असून ती फरिदाबाद येथील रुग्णालयात प्रशिक्षण घेत आहे. आपल्या मुलाने अभियंता व्हावे, अशी शाहबाजच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी फरिदाबादच्या महाविद्यालयात प्रवेशही घेतला.

इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शहाबाजेचे मन रमायचे नाही..

वडिलांच्या इच्छेखातर शहाबाजने इंजीनियरिंग कॉलेजमध्ये घेतला. पण त्याचे अभ्यासात मन रमले नाही. तो क्रिकेटसाठी क्लास बंक करायचा. ही माहिती वडिलांना कॉलेजमधून मिळाली. यावर वडील अहमद जान मुलाशी बोलले. त्यांनी शाहबाजला क्रिकेट किंवा अभियांत्रिकी यापैकी एकाची निवड करून त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ल्या दिला. त्यानंतर शाहबाजने क्रिकेटची निवड केली.

क्रिकेटसाठी बंगालला गेला…

शाहबाजने गुडगावमधील क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. क्रिकेटसोबतच शाहबाजने शिक्षणही सुरू ठेवले. त्याने इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर मित्र प्रमोद चंडिलाच्या सांगण्यावरून तो बंगालला गेला. स्वत: चंडिला तिथल्या एका क्रिकेट क्लबकडून खेळायचा. शाहबाजने प. बंगालच्या अंतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याची 2018-19 मध्ये बंगाल रणजी संघात निवड झाली. यानंतर त्याची 2019-20 मध्ये भारत-अ संघात निवड झाली.

आरसीबीने त्याला पहिल्यांदा लिलावात खरेदी केले

शाहबाजला 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने 20 लाख रुपयांना विकत घेतले. त्यावर्षी यूएईमध्ये त्याला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने एक धाव आणि दोन विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर शाहबाजला 2021 मध्ये 11 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर 59 धावा करण्यासोबतच सात विकेट्सही घेतल्या. शाहबाजला यंदाच्या लिलावात आरसीबीने 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची बेस प्राईज 20 लाख रुपये होती.

IPL 2022 मध्ये शाहबाजची कामगिरी

अष्टपैलू शाहबाजने यंदाच्या मोसमात चांगली फलंदाजी केली आहे. आयपीएल 2022 मध्ये, शाहबाजने 16 सामने खेळले आणि 27.38 च्या सरासरीने आणि 120.99 च्या स्ट्राइक रेटने 219 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 45 धावांची होती. त्याच वेळी, गोलंदाजीत शाहबाजने 9.60 च्या इकॉनॉमीने धावा लुटल्या आणि 4 विकेट घेतल्या.

आणखी वाचा…

Back to top button