कोल्हापूर : पालेश्वर डॅमच्या सांडव्यात हातकणंगलेतील तरुण बुडाला | पुढारी

कोल्हापूर : पालेश्वर डॅमच्या सांडव्यात हातकणंगलेतील तरुण बुडाला

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा : माण (ता. शाहूवाडी) येथील पालेश्वर लघु पाटबंधारे प्रकल्‍पाच्‍या सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात तरुण बुडून बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. राजेश बाबुराव पाटील (वय ३५, रा. लाटवडे, ता. हातकणंगले) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विकास बाजीराव माळी (रा.लाटवडे) यांनी शाहूवाडी पोलिसांत वर्दी दिली आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद कोळपे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन बेपत्ता तरुणा च्या मित्रांकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूचनेनुसार कोल्हापूर येथील जीवनरक्षक रेस्क्यू फोर्सची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, सायंकाळची वेळ आणि मोठा पाणीप्रवाह यामुळे शोधमोहीम राबविण्यात अडथळे येत होते. युवकाचे नातेवाईक, मित्र, स्थानिक नागरिक, शाहूवाडी पोलीस तसेच जीवनरक्षक रेस्क्यू टीमने मंगळवारी दुपारी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. मात्र, बुडून बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेण्यात यश आले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाटवडे (ता. हातकणंगले) येथील राजेश पाटील याच्यासह ९ मित्र मिळून सोमवारी ( दि. १५) दुपारी १२.३० च्या सुमारास शाहूवाडी तालुक्यातील माण पालेश्वर डॅम पाहण्यासाठी आले होते. धरणाच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यातील सांडव्यातून पडणारे धबधब्याचे पाणी पाहण्यासाठी सर्वजण गेले होते. यावेळी पाण्यात उतरलेला राजेश पाटील हा युवक प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पोलीस आणि जीवनरक्षक रेस्क्यू जवानांनी बेपत्ता युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू फोर्सचे जिल्हा व्यवस्थापक प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कांबळे, राज मोरे, शुभम काटकर, रोहित जाधव, सोमनाथ सुतार, आकाश लोकरे, जीवन कुबडे यांच्या पथकाने स्कूबा ड्राईव्हच्या माध्यमातून मंगळवारी दुपारनंतर पुन्हा शोध कार्य सुरू ठेवले आहे. शाहूवाडी पोलीस पथक, मंडल अधिकारी संदेश कदम, पोलीस पाटील सुशीला कांबळे, कुमार पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक घटनास्थळी शोध मोहीमेत सहभागी झाले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button