

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा मधील दिर्घ विश्रांतीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे विभागातील बीडमधील तब्बल ३२ मंडळात तर इतर सहा जिल्ह्यांतील ३५ अशा एकूण ६७ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात कन्नड-चाळीसगाव घाटात दरड कोसळल्याने व बीड तालुक्यात राक्षसभवन येथील पूल वाहून गेल्याने मार्ग बंद झाला.
तर गेवराईतील राजापूर गावाच्या मार्गावरही पाणी साचल्याने या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिक जीव वाचविण्यासाठी घराच्या छतावर जाऊन बसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मराठवाड्यात रात्रीतून ३८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाडा मध्ये सोमवारपासून पावसाला पुन्हा सुरूवात झाली. दिवसभर विभागात सर्वदूर तुरळक स्वरुपात हजेरी लावल्यानंतर रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. त्यामुळे विभागातील बीड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
यात जिल्ह्यातील ३२ मंडळात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने पाणी थेट परिसरातील वसाहतींतील घरांमध्ये शिरल्याची घटना घडली आहे.
गेवराई तालुक्यात हिरकपूरी, जोगला देवी, गोदावरी नदीवरील अनेक बंधारे ओव्हर फ्लो झाल्याने राजापूर गावाचा चार तास संपर्क तुटला होता. परंतु सध्या परिस्थित नियंत्रणात आली आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.
विभागात हिंगोली वगळता इतर सात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे औरंगाबादेत ९, जालन्यात ८, बीड ३२, लातूर ४, उस्मानाबाद १, नांदेड ७ आणि परभणी ५ अशा ६७ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
दरम्यान, अतिवृष्टी झालेल्या ६७ पैकी २० मंडळात शंभर मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
त्यात परभणीतील पालम मंडळात ११०, हदगाव १३०.७५ मि. मी., केसापूरी १०६.७५ मि.मी., बीडमधील पिंपळनेर २१४.५० मि.मी., पेंडगाव ११८ मि.मी., नालवंडी १९०.२५ मि.मी., मालसाजव १६६.२५ मि.मी., गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे सर्वाधिक २३४.५० मि.मी., आंबेजोगाईतील पातोड्यात १६०.२५ मि.मी., मादलमोह १११.२५. मि.मी., आष्टीतील दावलावाडमध्ये १२६ मि.मी., छाकलांब ११७ मि.मी., उमापूर १०० मि.मी., नांदेडच्या चांडोल १२८.२५ मि.मी., मालकोली १३७.२५ मि.मी. तर जालन्यातील तिर्थपूरी १२१.२५ मि.मी., औरंगाबादेतील चिंचोली लिंबाजी १०९ मि.मी., कन्नड ११०.२५ मि.मी., पैठणमधील विहामांडवा येथे ११२.२५ मि.मी. एवढी नोंद झाली आहे.
तर इतर ४७ मंडळामध्ये ६५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
दरम्यान, कन्नड घाटातील परिस्थितीची पाहणी आमदार उदयसिंह राजपूत आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे.