

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर मध्ये अल्पवयीन मुलीवर ऑटोचालक आणि हमालांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.
पीडित मुलगी गुरूवार, २९ जुलै रोजी घरातून निघून नागपूर येथील रेल्वेस्थानकावर आली होती. मात्र पुरेसे पैसे नसल्याने ती रेल्वेस्थानकाच्या बाहेर जाऊ शकली नाही. त्याच वेळी दोन ऑटोचालकांनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीवर नेले. तिथे अन्य एक ऑटोचालक मित्रासह आणखी एकाला बोलावून घेतले.
या चौघांपैकी दोघांनी गुरूवारी रात्री तिच्यावर बलात्कार केला. तर दोघांनी मेयो चौकातील मेट्रो उड्डाणपुलाखाली ऑटोत बलात्कार करून शुक्रवारी पहाटे तिला मेयो रूग्णालयाजवळ सोडून दिले.
मेयो जवळ एकटीच बसलेल्या या मुलीला काही लोकांनी परत रेल्वेस्थानकावर आणून सोडले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तिची वैद्यकीय व कोरोना तपासणी करून तिला आशा किरण बालगृहात दाखल केले. ही मुलगी दोन दिवस आशा किरण बालगृहात होती.
बालगृहाच्या अधिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिथे तिच्याबाबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आरपीएफने चाईल्ड लाईन कर्मचारी व बालगृहाच्या अधिक्षीकेसमक्ष तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर रेल्वे पोलिस अधीक्षक मनीषा काशिद यांनी आरोपींना ताब्यात घेतले. घटनास्थळ बर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तिथे सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.