मुख्यमंत्री सांगली दौरा : ‘सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेईल’ | पुढारी

मुख्यमंत्री सांगली दौरा : 'सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेईल'

भिलवडी; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री सांगली दौरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिलवडी, अंकलखोप, औदुंबर येथील पूर परिस्थितीची पाहणी केली.

कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी पुरपट्टयातील परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

मुख्यमंत्री सांगली दौरा

महापुराने सर्वसामान्य, शेतकरी, व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीची मदत देण्यासाठी मी आढावा घेत आहे. सरकार सर्वसामांन्यांच्या हिताचे निर्णय घेईल. पुनर्वसनासाठी प्रसंगी कठोर पावले उचलावी लागतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ते भिलवडी – अंकलखोप येथे पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यावर बोलत होते. खासदार धैर्यशिल माने, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, महेंद्र लाड, मुख्य सचिव सिताराम कुंटे, आय जी मनोजकुमार लोहिया, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

पूरबाधित गावांच्या वतीने मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले. यामध्ये शंभर टक्के मदत देण्याची प्रमुख मागणी केली गेली. महापुराने कृष्णाकाठच्या परिसराचे मोठे नुकसान झाले.

घरांची पडझड, शेतीचे नुकसान व्यापार्यांची दुर्दशा आणि गावकऱ्यांना कराव लागणार स्थलांतर यावर काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. महापूर काळात गाव पाण्यात असते.

गावाला पूर्णपणे पाण्याचा वेढा असतो. अशा वेळी सर्वच गांव स्थलांतरीत होते. त्यामुळे सर्वांनाच सानुग्रह अनुदान मंजूर करावे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना सर्वाधिक मोबदला मिळण्याबरोबरच पुरबाधित शेतकऱ्यांची सोसायटी पिक कर्जे माफ करावीत.

लॉकडाऊन आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. पूरग्रस्तांची शेती आणि घरगुती लाईट बिले माफ करण्यात यावीत.

सतत महापुरात पाण्याखाली जाणाऱ्या घरांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे.

नदीकाठी पूरसंरक्षक भिंत बांधावी. भिलवडीच्या मुख्य पुलाच्या पूर्वेला नवीन पुलाची निर्मिती करावी. शासनाकडून आपत्कालीन विमा योजना अमलात आणावी अशा मागण्या करण्यात आल्या.

Back to top button