

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 45 हजार शेतकर्यांना गत वर्षातील खरीप हंगामात मंजूर केलेली पीकविमा रक्कम देणे अचानक थांबविले आहे. कंपनीने सुमारे 68 कोटी रुपये संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर तत्काळ जमा करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
येत्या आठवड्यात ही रक्कम जमा न केल्यास मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह रिलायन्स कंपनीच्या येथील कार्यालयास त्यांनी मंगळवारी (दि. 7) भेट देत कंपनीच्या संबंधित अधिकार्यांशी चर्चा केली. शिष्टमंडळात सावकार मादनाईक, सचिन शिंदे, प्रशांत डिक्कर, बापू कारंडे, रोशन देशमुख आदींचा समावेश होता.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद येथील शेतकर्यांच्या विमाप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकतेच कृषी आयुक्तालयावर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांची रक्कम तत्काळ देण्याचे आदेश दिले.
त्यानुसार रिलायन्स कंपनीने रक्कम देण्यास सुरुवात केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनास यश आले होते. मात्र, काही राजकीय धुरिणांकडून त्यास 'खो' घालण्यात येऊन नुकसानीची विम्याची रक्कम देण्याचे काम कंपनीने अचानक थांबविले. त्याचा जाब विचारण्यासाठी कंपनीचे कार्यालय गाठले आणि वरिष्ठ अधिकार्यांशीही दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.
त्यामुळे कंपनीने विम्याची रक्कम न दिल्यास आंदोलन अटळ असल्याचे शेट्टी यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.