

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. आज सोमवारी (दि.६ सप्टेंबर) आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी दरात तेजी दिसून आली.
३ सप्टेंबरच्या तुलनेत आज ६ सप्टेंबर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे ३२७ रुपयांनी महागला. तर चांदीचा दर प्रति किलोमागे १,६४१ रुपयांनी वाढला.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Price Today (दुपारी १२ वाजेपर्यंतचे अपडेट्स) सोमवारी ६ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४७,५७३ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,३८३ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,५७७ रुपये, १८ कॅरेट ३५,६८० रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,८३० रुपये होता.
तर चांदीचा प्रति किलो दर ६५,११६ रुपये होता.
दरम्यान, सोमवारी एमसीएक्स (MCX) गोल्ड फ्यूचर्समध्ये काही प्रमाणात घसरण दिसून आली. गोल्ड फ्यूचर्समध्ये ०.१५ टक्के घसरून होऊन दर प्रति १० ग्रॅम ४७,४५१ रुपयांवर आला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी आली आहे. सोन्याचे दर दोन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या स्पॉट दर प्रति औंस १,८२६ डॉलरवर तर चांदीचा दर प्रति औंस २४.६९ डॉलरवर पोहोचला आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.
दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.