

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव एसपी कार्यालय आवारात दोन कुटुंबियांमध्ये कौटुंबिक वादातून हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला. यावेळी एलसीबी चे कर्मचारी व महिला दक्षता समितीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी जिल्हा पोलिस ठाण्यात कळविण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण येथील गणेश गिरी याचा विवाह जामनेर तालुक्यातील वाकोद येथील बरखा गणेश गिरी या मुलीशी चार महिन्यापूर्वी झाला होता. दोन महिने सुखी संसार झाल्यानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. नवऱ्याने घर जावई व्हावे यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे मुलगी बरखा ही जामनेरला आई-वडिलांकडे निघून आली.
याप्रकरणी जळगाव एसपी कार्यालय मधील महिला दक्षता समितीमध्ये तक्रार करण्यात आली होती. आज (दि. १६) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन्ही कुटुंबातील परिवार एस पी कार्यालयाच्या ठिकाणी तारखेवर आले होते. त्यावेळी हेडकॉन्स्टेबल मनीषा पाटील, अभिलाषा मनोरे, एन पी सी संगीता पवार यांनी दोन्ही कुटुंबांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना कौन्सिलिंग केले.
दोन्ही परिवार कार्यालयातून बाहेर पडल्यावर तुफान हाणामारी झाली.
यात गणेश गिरी व बरखाचे मामा हे जखमी झाले यावेळी एलसीडी चे कर्मचारी व महिला पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
या घटनेची माहिती जिल्हा पोलिस ठाण्यात कळविण्यात आल्याचे महिला दक्षता समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.