पुणे आरटीओ अंधारात, महावितरणची साडे-बारा लाखांची थकबाकी | पुढारी

पुणे आरटीओ अंधारात, महावितरणची साडे-बारा लाखांची थकबाकी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या सुमारे साडे-बारा लाख रूपयांच्या लाईट बिलांच्या थकबाकीमुळे महावितरणने पुणे आरटीओची (प्रादेशिक परिवहन कार्यालय) गुरूवारी वीज कापली.

परिणामी, इतर ठिकाणच्या आरटीओ कार्यालयांच्या तुलनेत शासनाला जादा महसूल मिळवून देण्यात आघाडीवर असलेले पुणे आरटीओ गुरूवारी अंधारात राहिले.

अचानकपणे आरटीओ कार्यालयातील लाईट गेल्यामुळे लायसन्सच्या कामासाठी आलेल्या नागरिकांना काही वेळ मनस्ताप सहन करावा लागला. अनेक तास नागरिकांना कागदपत्रांची कामे करण्यासाठी वाट पहावी लागली. काही वेळाने आरटीओ प्रशासनाने नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी जनरेटरद्वारे कार्यालयाला विद्युत पुरवठा सुरू केला.

मात्र, यावेळी अनेक नागरिकांची कामे बर्‍याचवेळ रखडल्याचे समोर आले. तसेच, जादा महसूल मिळवून देणार्‍या आरटीओ कार्यालयाची वीज कशी कापली जाते. याबाबत नागरिकांनी आणि विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले.

राज्यभरात 50 पेक्षा अधिक आरटीओ कार्यालये आहेत. यात सर्वाधिक महसूल  पुणे आरटीओच्या माध्यमातून शासनाला मिळत आहे. परंतु, त्याच कार्यालयाची लाईट  वीज बील थकल्यामुळे कापली जाते. त्यामुळे हा विषय दिवसभर इतर शासकीय कार्यालयांमध्ये चांगलाच रंगला. काही ठिकाणी हास्यांचे फवारे उडाले तर काही ठिकाणी शासकीय कामकाजाबाबत नाराजी दर्शविण्यात आली. तसेच, येथून पुढे असे होऊ नये, असे मतही अनेक जाणकारांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेक दिवसांपासून वीज बिलाची थकबाकी आहे. सुमारे साडे बारा लाख रूपयांची थकबाकी असल्यामुळे महावितरणने गुरूवारी वीज कापली. परंतु, आम्ही नागरिकांना याचा त्रास होऊ देणार नाही. उद्या कार्यालयातील सर्व कामे सुरळीत सुरू राहतील.
डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Back to top button