गणेशोत्सव : कोकणच्या ‘महाउत्सवास’ आजपासून प्रारंभ!

गणेशोत्सव : देवगड - कितीही आधुनिकता आली आणि वाहतुकीच्या सोयी झाल्या तरी पारंपरिक डोलीतून बाप्पांची मूर्ती घरी नेण्यातील आनंद काही वेगळाच असतो. देवगडमधील हे छायाचित्र. 	(छाया: वैभव केळकर)
गणेशोत्सव : देवगड - कितीही आधुनिकता आली आणि वाहतुकीच्या सोयी झाल्या तरी पारंपरिक डोलीतून बाप्पांची मूर्ती घरी नेण्यातील आनंद काही वेगळाच असतो. देवगडमधील हे छायाचित्र. (छाया: वैभव केळकर)
Published on
Updated on

कणकवली; अजित सावंत : संपूर्ण जगभर गणेशोत्सव साजरा होत असला तरी कोकणात गणेशोत्सवाला महाउत्सवाचे स्वरूप असते. विघ्नहर्ता श्री गणरायाच्या स्वागतासाठी अवघा सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे.

शुक्रवार 10 सप्टेंबर अर्थात भाद्रपद चतुर्थीदिवशी घरोघरी बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या महाउत्सवासाठी सिंधुदुर्गात गेल्या चार दिवसांपासून सुमारे अडीच लाखांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. गुरुवारी तर चाकरमान्यांच्या गर्दीचा उच्चांक झाला.

गुरुवारीही बाजारहाट, भाजीपाला, फळफळावळ खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. पावसानेही उघडीप दिल्याने गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला. बाप्पांच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली असून घरोघरी मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सुमारे 68 हजार 313 घरगुती तर 32 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पुढील अकरा, एकवीस दिवस अवघा सिंधुदुर्ग भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

गेल्यावर्षी गणेशोत्सव काळात कोरोनाचे संकट अधिक गडद होते, त्यामुळे शासनाने अनेक निर्बंध लादले होते. परिणामी मुंबईकर चाकरमान्यांना इच्छा असूनही गावी येता आले नव्हते. जे आले होते त्यांना आधी पंधरा ते सात दिवस येेऊन क्वारंटाईन व्हावे लागले होते. त्यामुळे गतवर्षी चाकरमान्यांसह सर्वच गणेभक्तांनी पुढच्या वर्षी तरी कोरोनाचे संकट दूर होवू दे, असे साकडे गणरायाला घातले होते.

बाप्पाने निश्चितपणे गणेशभक्तांचे गार्‍हाणे ऐकले आणि कोरोनाची तीव्रता महाराष्ट्रात बर्‍यापैकी कमी झाली. त्यामुळे कोकण रेल्वे, एस.टी., खासगी बसेस आणि खासगी वाहनांनी गेल्या चार दिवसांपासून लाखोंच्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात, कोकणात दाखल झाले.

गुरुवारी तर चाकरमान्यांच्या गर्दीचा मोठा उच्चांक झाला. मोठ्या संख्येने आलेल्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या सर्वच बाजारपेठांमध्ये गुरूवारीही मोठी गर्दी उसळली होती. गतवर्षी येता आले नाही. मात्र, यावर्षी चतुर्थीला गावी येता आल्याचा आनंद चाकरमान्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता.

घरोघरी स्वागताची जय्यत तयारी

शुक्रवारी 10 सप्टेंबर रोजी गणरायाची प्रतिष्ठापना घरोघरी होणार आहे. यासाठी सर्व घरेदारे सजली आहेत. गाव, वस्त्या, वाड्या गजबजून गेल्या आहेत. एरव्ही वर्षभर बंद असणारी चाकरमान्यांची घरे आता उघडली आहेत. घरादारांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. तोरणे बांधण्यात आली आहेत. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पूर्वी घरांमध्ये मातीच्या जमिनी असल्याने त्या शेणाने सारवाव्या लागत, भिंतींना गिलावा काढावा लागत असे, मात्र कालौघात हे सारे चित्र बदले आहे.

जमिनीच्या ठिकाणी आता स्टाईल्स, लाद्या बसविण्यात आल्या आहेत. मातीच्या भिंती चिरेबंदी झाल्या आहेत. पूर्वी साध्या रंगांनी भिंती रंगविल्या जात होत्या, आता त्याची जागा ऑईलपेंट आणि वॉशेबल कलरने घेतली आहे. पूर्वी गणपती ज्या ठिकाणी विराजमान होत असे त्या मागे भिंतीवर हाताने चित्रे काढली जात असत. मात्र त्याची जागा आता डिजिटल बॅनरने घेतली आहे.

देवदेवता तसेच नैसर्गिक चित्रे आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध होवू लागली आहेत. अर्थात जमाना बदलल्याने कितीही आधुनिकता आली तरी बाप्पांच्या आरासेससाठी कांगले, कवंडळे, तिरडे, हरणे, बेडे यांचे महत्त्व मात्र कायम आहे.

विद्युत रोषणाईने घरेदारे उजळली

बाप्पांचे आगमन म्हणजे विद्युत रोषणाई आलीच. पूर्वी चाकरमानी गावी आला की त्याच्या बॅगेत दोन-चार चायना तोरणांच्या माळा असायच्या. मात्र चीनच्या भारत विरोधी कुरापतींमुळे चीनची भारतातील बाजारपेठ आता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, तोरणे या भारतीय बनावट वस्तूंना मागणी वाढली आहे. पूर्वी चाकरमानी इलेक्ट्रॉनिक वस्तू मुंबईहून आणत असत. मात्र, आता गावी या सर्वच वस्तू मिळू लागल्याने शहराच्या बाजारपेठांमध्येच त्याची खरेदी होते. बाप्पांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येपासूनच विद्युत रोषणाईने आणि रंगरंगोटीने घरेदारे सजली आहेत.

बाप्पांचे वाजत गाजत आगमन

गणेशचतुर्थीदिवशी सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात मूर्तिशाळांमधून गणेशमूर्ती घरोघरी नेल्या जातात. अनेक ठिकाणी दूरची मंडळी आदल्या दिवशीच बाप्पांची मूर्ती घरी नेतात. गुरुवारी दिवसभर अनेक वाहनांनी वाजत गाजत तर काहींनी डोक्यावरून गणेशमूर्ती आपल्या घरी नेल्या. बुधवारी दिवसभर धो धो पाऊस कोसळलेला, मात्र शुक्रवार सकाळपासून उघडीप दिल्याने गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला. यंदा महागाईमुळे गणेशमूर्तींच्या किंमतीही वाढल्या आहेत.

भाजीपाला, फळांची मोठी विक्री

गणेशोत्सव काळात भाजीपाला आणि विविध प्रकारच्या फळांना मोठी मागणी असते. सिंधुदुर्गात कोल्हापूर, बेळगाव, निपाणी अशा विविध भागातून भाजीपाला येतो. त्याचबरोबर जिल्ह्यातील स्थानिक शेतकर्‍यांकडून काकडी, पडवळ, दोडकी, कार्ली, भेंडी अशा विविध प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी येतात. गुरुवारीही भाजीपाला आणि सफरचंद, केळी, शहाळी तसेच विविध फळांची मोठी विक्री झाली. दरवर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात सर्वच वस्तुंचे दर वधारले आहेत. मात्र बाप्पांच्या उत्सवात कोणतीही कमी राहणार नाही याची काळजी भक्तांनी घेतली आहे.

सिंधुदुर्ग झाला भक्तिमय

गुरुवारी हरितालिका उत्सव जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात पार पडला. आता शुक्रवारपासून पुढील अकरा, एकवीस दिवस भजन, आरती, फुगड्या अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिल्हा भक्तिरसात न्हावून निघणार आहे. प्रत्येक गावात, वाडीवाडीत भजन मंडळे आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल…चे स्वर आता गावागावात, वाडीवाडीत घुमणार आहेत.

कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि प्रशासनाने केले आहे. सुरुवातीला प्रशासनाने दोन डोस न घेतलेल्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. मात्र, चाकरमान्यांच्या तोबा गर्दीमुळे ती शक्य नसल्याने ती चाचणी रॅपीडवर आणण्यात आली. मात्र, तेही शक्य नसल्याने चाकरमान्यांची नोंदणी त्या त्या रेल्वेस्थानकांवर, बसस्थानकांवर करण्यात आली. आता घरोघरी जावून चाकरमान्यांची रॅपिड टेस्ट करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले असले तरी तुटपुंजे कर्मचारी पाहता तेही शक्य नसल्याचे दिसते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : बाप्पाचे प्रिय उकडीचे मोदक | Modak Recipe

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news