Ganesh Utsav 2023 : श्री सत्यनारायणाची आरती | पुढारी

Ganesh Utsav 2023 : श्री सत्यनारायणाची आरती

Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्री गणेशाच्या स्थापनेने गणेश उत्सव 2023 चा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली.  श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. सर्वत्र गणेश उत्सव 2023 चा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. विघ्नहर्ता बाप्पा सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करो, हीच प्रार्थना आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह श्री सत्य नारायणाची आरती ही गणेश चतुर्थी उत्‍सव काळातील पुजेत म्‍हटली जाते.

गणेश उत्‍सव २०२३ : श्री सत्यनारायणाची आरती

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारती ओवाळू श्रीपती तुज भक्तिभावा ॥ध्रु.॥

विधियुक्त पुजूनी करिती पुराण श्रवण॥
परिमळ द्रव्यासहित पुष्पमाळा अर्पून।
घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण।
प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण ॥1॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारती ओवाळू श्रीपती तुज भक्तिभावा ॥ध्रु.॥

शतानंदविप्रे पूर्वी व्रत हे आचरिले।
दरिद्र दवडुनी अंती त्याते मोक्षपदा नेले।
त्यापासूनि हे व्रत या कलियुगी सकळा श्रुत झाले।
भावार्थे पूजिता सर्वां इच्छित लाभले ॥ 2॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारती ओवाळू श्रीपती तुज भक्तिभावा ॥ध्रु.॥

साधुवैश्ये संततिसाठी तुजला प्रार्थीयले।
इच्छित पुरता मदांध होऊनि व्रत न आचरिले।
त्या पापाने संकटी पडुनी दु:खही भोगिले।
स्मृती होऊनि आचरिता व्रत त्या तुवाचि उद्धरिले ॥ 3॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारती ओवाळू श्रीपती तुज भक्तिभावा ॥ध्रु.॥

प्रसाद विसरूनी पतिभेटीला कलावती गेली।
क्षोभ तुझा होताचि तयाचि नौका बुडाली।
अंगध्वजरायासी यापरि दु:खस्थिती आली।
मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी पसरली ॥ 4॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारती ओवाळू श्रीपती तुज भक्तिभावा ॥ध्रु.॥

पुनरपि पुजुनी प्रसाद ग्रहण करिता तत्क्षणी।
पतीची नौका तरली देखे कलावती नयनी।
अंगध्वजरायासि पुत्र भेटती येऊनी
ऐसा भक्ता संकटी पावसी तू चक्रपाणी ॥ 5॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारती ओवाळू श्रीपती तुज भक्तिभावा ॥ध्रु.॥

अनन्यभावे पूजुनी हे व्रत जे जन आचरती।
इच्छित पुरविसी त्याते देऊनी संतति संपत्ती।
संहरति भय दुरिते सर्वही बंधने तुटती।
राजा रंका समान मानुनी पावसी श्रीपती ॥ 6॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारती ओवाळू श्रीपती तुज भक्तिभावा ॥ध्रु.॥

ऐसा तव व्रत अपार महिमा वर्णू मी कैसा।
भक्तिपुर:सर आचरती त्या पावसि जगदीशा।
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तू सर्वेशा।
मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥7॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारती ओवाळू श्रीपती तुज भक्तिभावा ॥ध्रु.॥

हेही वाचलंत का?

Back to top button