गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त दुपारी दोनपर्यंतचा, जाणून घ्या प्रतिष्ठापना कशी करावी | पुढारी

गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त दुपारी दोनपर्यंतचा, जाणून घ्या प्रतिष्ठापना कशी करावी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारी (दि. 10) भाद्रपद शुद्ध चतुर्थीदिवशी श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पहाटे 4 वाजून 50 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 50 मिनिटांपर्यंत घरगुती गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त आहे. त्याकरिता भद्रादी (विष्टी) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त दुपारी दोन वाजल्यानंतर ही आहे.

यावर्षी ज्यांना गावी जाणे शक्य नाही, त्यांनी राहत्या घरी गणेशोत्सव साजरा करून श्री गणेशपूजनाची परंपरा अखंडित ठेवावी. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे ज्याप्रमाणे अनेक बदल आपण अंगीकारले आहेत, त्याप्रमाणे गणेशोत्सवातसुद्धा आपल्याला बदल करावा लागेल. त्यामुळे साधेपणाने श्री गणेशपूजन करून विघ्नहर्त्याकडे कोरोनाचे संकट लवकरात लवकर संपावे, अशी कामना करावी, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

यंदा वाद्यांच्या दणदणाटाशिवाय आगमन

कोरोनामुळे यंदा गणेश आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांवर प्रशासनाने बंदी घातली आहे.

यामुळे घरगुती गणेशमूर्तींप्रमाणेच सार्वजनिक मंडळांच्याही गणेशमूर्तींचे आगमन मोजक्या कार्यकर्त्यांसह आणि कोणत्याही वाद्यांच्या दणदणाटाशिवाय सुरू आहे.

यामुळे प्रतिवर्षी दिसणारा उत्साह तुलनेने कमी झाला आहे. यामुळे पारंपरिक वाद्ये, बँजो पथकांच्या हंगामावर कोरोनाचे सावट गतवर्षीप्रमाणेच कायम आहे.

सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या आणि आबालवृद्ध आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणेशोत्सवाच्या चैतन्यदायी सोहळ्यास आज, शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. विघ्नहर्त्या श्री गणरायाचे आगमन गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर होत आहे.

गतवर्षीपासून कोरोनाच्या भीतीखाली वावरणार्‍या लोकांमध्ये उत्साह आणि भक्तिभाव जागविणार्‍या गणेशोत्सवाच्या मंगलमय सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघी करवीरनगरी सज्ज झाली आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवावर विविध निर्बंध असल्याने बहुतांशी लोकांनी घरगुती गणेशोत्सवावर लक्ष केंद्रित केले आहे.

यामुळे घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असून, घराघरांत चैतन्य निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे प्रशासनाने लागू केलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून गतवर्षीप्रमाणेच यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत कोरोनापासून सावरलेल्या लोकांनी यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याची तयारी केली आहे. गुरुवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरूच होती.

ऊन-पावसाच्या उत्साही वातावरणातच गणेशमूर्ती नेण्यात आल्या. घरगुती गणेशमूर्तींप्रमाणेच अनेक सार्वजनिक मंडळांच्याही गणेशमूर्ती चतुर्थीच्या पूर्वसंध्येला रवाना झाल्या.

गरुड मंडपात 131 वा गणेशोत्सव

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या वतीने 131 व्या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पापाची तिकटी येथील कुंभार कुटुंबीयांनी तयार केलेली शाडूची गणेशमूर्ती गुरुवारी सायंकाळी रथातून ओढत अंबाबाई मंदिरापर्यंत नेण्यात आली. गरुड मंडपात गणेशाची रात्री प्रतिष्ठापना करण्यात आली.

Back to top button