

करवीरचा ऐतिहासिक पारंपरिक दसरा सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे होणार आहे. कोरोनाचे नियम पाळून दसरा चौकात शुक्रवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी पारंपरिक पद्धतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शाहू महाराज यांनी आज (मंगळवार) प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली.
सन 2020 मध्ये कोरोना महामारीचे संकट निर्माण झाल्याने गतवर्षी सर्वांना लॉकडाऊनचा सामना करावा लागला. यामुळे सर्व क्षेत्रे ठप्प झाली होती. इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच धार्मिक सोहळे, सण-उत्सव-समारंभावरही मोठा परिणाम झाला.
मंदिरेही दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. यामुळे करवीरचा ऐतिहासिक पारंपरिक दसरा सोहळ्याचे स्वरूपही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी दसरा चौकात होणारा हा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जुना राजवाडा येथे बंदिस्त स्वरूपात घेण्यात आला होता.
कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या भीतीमुळे यंदाच्या दसरा सोहळ्याविषयी उत्सुकता सर्वांना होती. दरम्यान, कोरोनाचा कहर कमी झाल्याने राज्य शासनाने नवरात्रौत्सवानिमित्त धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा ऐतिहासिक ठेवा असणारा दसरा सोहळाही प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचे नियम पाळून, सुरक्षित अंतराच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून हा सोहळा होत आहे. सोहळ्याचे थेट प्रक्षेपण प्रसिद्धी माध्यमांद्वारे करण्यात येणार असल्याचे शाहू महाराज यांनी पत्रकात नमूद केले आहे.
हेही वाचा :