

मुंबई ; जयंत होवाळ : ( मुंबई मनपा निवडणूक : काँग्रेस ) राष्ट्रवादीवरील अविश्वास,जागा वाटपात अपेक्षित जागा मिळण्याबाबतची साशंकता आणि मिळणार्या जागांमध्ये तिकीट वाटपाची डोकेदुखी; परिणामी होणारी संभाव्य बंडखोरी. या प्रमुख कारणांमुळे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा मुंबई काँग्रेस चा इरादा असल्याचे समजते. त्याचबरोबर स्वतंत्रपणे लढून ताकद अजमावून नंतर आघाडीत सहभागी होण्याबाबत विचार करता येईल,असाही जोरदार मतप्रवाह असल्याचे दिसते.
महापालिका निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीसोबत युती करावी,असे प्रदेश काँग्रेसच्या काही नेत्यांचे मत आहे. मात्र मुंबई काँग्रेस त्यांच्या या मताशी सहमत नाही. नुकत्याच झालेल्या काही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने प्रभावी कामगिरी केली.
त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे.ही बाब लक्षात घेता मुंबई महापालिका निवडणुकीतही स्वतंत्र लढण्याचा प्रयोग करून पाहायला हरकत नाही,अशी मुंबई काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना आहे ( मुंबई मनपा निवडणूक : काँग्रेस ).
मुळात काँग्रेसचा राष्ट्रवादीवर अजिबात भरवसा नाही.2017 साली राष्ट्रवादीसोबत युती केल्यानंतर आलेला कटू अनुभव अजून काँग्रेसच्या स्मरणात आहे.मुंबईत राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसचा जनाधार आणि संघटन बर्यापैकी मजबूत आहे.आघाडी केल्याने काँग्रेसच्या या ताकदीचा राष्ट्रवादीला फायदा होईल. मात्र राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसला कितपत मदत करेल याविषयी काँग्रेसला शंका आहे.
दुसरा प्रमुख मुद्दा आहे जागावाटपाचा! तीन पक्षांच्या आघाडीत आपल्या वाट्याला किती जागा येतील,हा काँग्रेसपुढे प्रश्न आहे.सध्या पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने साहजिकच ते जास्त जागांवर हक्क सांगणार! आपल्या वाट्याला सुमारे 60 जागा आल्या तर त्यातून जेमतेम 30-35 उमेदवार निवडून येतील. मागील वेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढून काँग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले होते.त्यामुळे आघाडी करूनही मागील निवडणुकीएवढ्याच जागा मिळाल्या,तर आघाडीचा काय फायदा, यादृष्टीनेही विचार होत आहे.
त्यातच तिकीट न मिळाल्यास बंडखोरीचे पीक येण्याची शक्यता आहे. स्वबळावर सर्व जागा लढल्यास अनेक इच्छुकांची शांती करता येईल. याउलट आघाडी झाल्यास कमी जागांमुळे पक्षांतर्गत अडचणी वाढतील. आघाडी झाल्यास शिवसेना, भाजपची ताकद असणार्या जागा गळ्यात मारेल,अशीही भीती मुंबई काँग्रेसला आहे.
हेही वाचा :