

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ पोलीस मुख्यालय वसाहतीत जुन्या वादातून पोलीस शिपायाचा हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडली. निलेश खडसे (वय ३४) असे मृत पोलिसाचे नाव आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. अभिषेक उर्फ अभी राजू बोंडे (वय २७) व कुंदन मेश्राम (वय २६ रा. पारवा, ता. झरी) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश खडसे हे पोलीस मुख्यालयातील बँड पथकात कार्यरत होते. बुधवारी रात्री दारूच्या नशेत असताना पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या वसाहतीमध्ये अंधाराचा फायदा घेत दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. हॉकी स्टिक व स्टील रॉडने मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या निलेशचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांनी पंचनामा केला. पोलिसांनी तात्काळदोघा संशयित आरोपींना अटक केली आहे. जुन्या वादातून निलेश याचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली असाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :