कमी पाणी पिल्याने होतो मूतखड्याचा त्रास | पुढारी

कमी पाणी पिल्याने होतो मूतखड्याचा त्रास

नवी दिल्ली ः पाण्याला आपल्याकडे ‘जीवन’ असे समर्पक नाव आहे. उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. कारण आपले शरीर निरोगी ठेवण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. म्हणजेच पाणी आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करते. पाणीच्या कमतरतेमुळे केवळ आपले शरीर डिहायड्रेटच होत नाही, तर किडनीमध्ये स्टोनची म्हणजेच मूतखड्याची समस्याही निर्माण होते, असे तज्ज्ञ सांगतात.

किडनी स्टोनची समस्या आजकाल लोकांमध्ये वाढत चालली आहे. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते. यामुळे किडनीमध्ये स्टोनचा त्रास होऊ लागतो. किडनी आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यामुळे रक्त फिल्टर होण्याचे काम होते. किडनी ही अन्नातून सोडियम, कॅल्शियम आणि इतर पोषकतत्त्वे गाळून रक्तातून खराब पदार्थ गाळून मूत्रमार्गाने बाहेर काढण्याचे काम करते. मात्र, शरीरात जेव्हा खनिजे आणि आयर्न मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा किडनी फिल्टर करू शकत नाही. अशा स्थितीत हे किडनीकडेच जमा होऊ लागते आणि तेथे स्टोन वाढायला लागतो.

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातून अधिक घाम निघत असतो. यामुळे शरीर डिहायड्रेट होते. तसेच शरीरात पाण्याची कमतरता भासते. डिहायड्रेशनच्या या स्थितीमध्ये किडनीमध्ये स्टोनचा त्रास अधिक वाढतो. या मोसमात कमी पाणी प्यायल्याने शरीरातील मीठ आणि खनिज पदार्थ क्रिस्टलचे रूप घेतात आणि स्टोन तयार होतो. ज्यांच्या घरात कोणाला ना कोणाल किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी दिवसातून कमीत की 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. याशिवाय मीठ कमी खावे. तसेच चिकन आणि मटणही कमी खावे, असे तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा 

Back to top button