650 year old ship discovery |
650 year old ship discovery | 650 वर्षांपूर्वीच्या जहाजाचा शोध

650 year old ship discovery | 650 वर्षांपूर्वीच्या जहाजाचा शोध

Published on

सिंगापूर : सिंगापूरच्या समुद्रकिनार्‍याजवळ सुमारे 650 वर्षे जुने जहाजाचे अवशेष सापडले असून, त्यातून निळ्या-पांढर्‍या रंगातील चिनी मातीच्या भांड्यांचा मोठा साठा उघडकीस आला आहे. हे जहाज चीनमधून प्राचीन ‘तेमासेक’ (आजचा सिंगापूर) या बंदराकडे जात असताना बुडाले असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे. या शोधामुळे मंगोल साम्राज्याच्या काळातील चिनी कलेचा आणि व्यापाराचा नवा इतिहास समोर येत आहे. समुद्रातील उत्खननाचे नेतृत्व सागरी पुरातत्त्वतज्ज्ञ मायकेल फ्लेकर यांनी केले. चार वर्षांच्या संशोधनानंतर या जहाजातील अवशेष आणि वस्तू बाहेर काढण्यात यश आले.

हजारो तुकडे, काही अखंड वस्तूही सापडल्या

संशोधकांना या ठिकाणी सुमारे 3.5 मेट्रिक टन सिरेमिकचे तुकडे मिळाले. त्यापैकी सुमारे 136 किलो वजनाचे ‘युआन राजवंश’ काळातील निळ्या-पांढर्‍या रंगांचे पोर्सेलिन आढळले. काही भांडी जवळजवळ अखंड अवस्थेतही सापडली. या भांड्यांवर चार नखांचा ड्रॅगन, फिनिक्स पक्षी आणि कमळाच्या तलावात पोहत असलेल्या मँडरिन बदकांचे नाजूक चित्रांकन दिसते. हे डिझाईन सम्राट वेन्झोंग यांच्या कारकिर्दीत (1328-1332) लोकप्रिय होते. त्यामुळे जहाज बुडण्याचा काळ 14 व्या शतकाच्या सुरुवातीपासून 1371 दरम्यान असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या काळात ही निळ्या-पांढर्‍या रंगांची पोर्सेलिन भांडी युरेशियातील उच्चवर्गात अत्यंत लोकप्रिय होती. त्यांची पारदर्शकता, मजबूतपणा आणि कलात्मक नक्षी यामुळे ती ‘अद्भुत’ वस्तू मानली जात. काही लोकांचा तर असा विश्वास होता की, विष पडल्यास ही भांडी तडकतात.

logo
Pudhari News
pudhari.news