

लंडन; वृत्तसंस्था : जगातील सर्वात आकर्षक उभयचर प्राण्यांपैकी एक मानला जाणारा ‘गॅलेक्सी फ्रॉग’ आता गंभीर धोक्यात सापडला आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या इशार्यानुसार अनियंत्रित फोटोग्राफी मोहिमा आणि पर्यटनामुळे या दुर्मीळ बेडकांच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाले आहे.
हा लहानसा, पण अत्यंत सुंदर बेडूक भारतातील पश्चिम घाट या जैवविविधतेने समृद्ध पर्वतरांगांतील सदाहरित जंगलांमध्येच आढळतो. आकाराने तो बोटाच्या टोकाएवढाच असतो. मात्र, त्याच्या अंगावर दिसणारे तारकांसारखे ठिपके त्याला आकाशगंगेप्रमाणे भासवतात. म्हणूनच त्याला ‘गॅलेक्सी फ्रॉग’ असे नाव मिळाले आहे. संशोधकांच्या मते हे बेडूक प्रामुख्याने ओलसर दगडांच्या फटींमध्ये, गळून पडलेल्या पानांमध्ये आणि कुजलेल्या ओंडक्यांच्या खाली लपून राहतात. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (यूसीएन) ने या प्रजातीला ‘असुरक्षित’ श्रेणीत ठेवले आहे.
नुकत्याच हर्पेटॉलॉजी नोटस् या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात या बेडकांच्या घटत्या संख्येबाबत गंभीर निरीक्षणे मांडली आहेत. झुलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेचे संशोधक राजकुमार के. पी. यांनी 2020 च्या सुरुवातीला पश्चिम घाटातील एका जंगलभागात सात गॅलेक्सी फ्रॉगचा समूह शोधून काढला होता. मात्र, कोरोना निर्बंधांनंतर ते पुन्हा त्या ठिकाणी परतले तेव्हा हा संपूर्ण समूह गायब झाल्याचे दिसून आले. संशोधनानुसार, गेल्या काही वर्षांत अनेक फोटोग्राफर त्या ठिकाणी येऊ लागले. उत्तम फोटो मिळवण्यासाठी ते ओंडके उलटवत, परिसर तुडवत आणि बेडकांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवत होते. काही वेळा चार तासांपर्यंत कॅमेर्यांचे तीव्र फ्लॅश वापरले जात होते. यामुळे बेडकांमध्ये ताण, उष्णता आणि आजारांचा धोका वाढल्याचे वैज्ञानिकांनी नमूद केले आहे.
अभ्यासात असेही नमूद करण्यात आले की, काही बेडकांचा मृत्यू झाल्याची शक्यता स्थानिक मार्गदर्शकांनी व्यक्त केली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, निसर्ग फोटोग्राफी योग्य नियमांनुसार केली, तर ती संवर्धनासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, जबाबदारीशिवाय केली जाणारी फोटोग्राफी या दुर्मीळ प्रजातीसाठी मोठा धोका बनू शकते. त्यामुळे भारतात निसर्ग आणि वन्यजीव फोटोग्राफीसाठी कठोर नैतिक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची गरज असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.