NASA Astronaut Frank Rubio : अंतराळात सर्वाधिक वेळ वास्तव्याचा नवा विक्रम | पुढारी

NASA Astronaut Frank Rubio : अंतराळात सर्वाधिक वेळ वास्तव्याचा नवा विक्रम

वॉशिंग्टन : ‘नासा’चा अंतराळवीर फ्रॅंक रुबिओने (NASA astronaut Frank Rubio) सर्वाधिक काळ अमेरिकन अंतराळ मोहिमेत वास्तव्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधील 69 व्या पथकातील सदस्य असलेल्या फ्रॅंकच्या खात्यावर पृथ्वीच्या ऑर्बिटरमध्ये 371 दिवस राहण्याचा विक्रम नोंद होत असून यादरम्यान त्याने ‘नासा’ अंतराळवीर मार्क हेई याचा 2022 मधील विक्रम मागे टाकला आहे.

संबंधित बातम्या : 

फ्रॅंक रुबिओने (NASA astronaut Frank Rubio) असा कोणताही विक्रम करण्याचे ध्येय निश्चित केले नव्हते. पण स्पेस ट्रॅव्हेलमध्ये तो इतका जुळवून घेण्यात यशस्वी झाला की, त्यामुळे त्याला मागील उच्चांक मोडीत काढणे सहज शक्य झाले. अंतराळात एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी राहता येते, हे ज्यांनी दाखवून दिले, त्यापैकी मी एक असल्याचा सार्थ अभिमान आहे, असे तो एका अमेरिकन वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाला.

चंद्र, मंगळावर अनेक मोहिमा रचल्या जात असताना मानवी शरीर स्पेसफ्लाईटशी कशा पद्धतीने जुळवून घेऊ शकते, यावर फ्रॅंकने यावेळी भर दिला. फ्रॅंक रुबिओने आपल्या मोहिमेला सुरुवात केली, त्यावेळी त्याच्यासाठी सहा महिने अंतराळात वास्तव्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, नंतर स्पेसक्राफ्ट मालफंक्शनसमोरील आव्हाने व संधी यावर अभ्यास करण्यासाठी त्याला मुदतवाढ देण्यात आली. ‘नासा’ अंतराळवीर वॅरेन वुडी हॉबर्गने रुबिओचे इतक्या प्रदीर्घ कालावधीकरिता कुटुंबापासून दूर राहणे कौतुकास्पद असल्याचे यावेळी सांगितले.

फ्रॅंक रुबिओ आता अंतराळात एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीकरिता राहणार्‍या काही मोजक्या अंतराळवीरांच्या मांदियाळीत सन्मानाने दाखल झाला आहे. यापूर्वी केवळ सातच अंतराळवीरांना अशी कामगिरी करता आली आहे. रुबिओ आता 27 सप्टेंबर रोजी पृथ्वीतलावर परतण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button