बर्धनारा गावात उरलेय एकच कुटुंब!

बर्धनारा गावात उरलेय एकच कुटुंब!

नालबारी : भारत विविधतेने नटलेला देश आहे. येथे आपल्या जवळपास प्रत्येक राज्यात काही ना काही अनोखे चित्र पहायला मिळते. एकीकडे, घनदाट वस्ती आढळून येते तर एकीकडे उजाड, सुन्न परिसरही दिसून येईल. एकीकडे, हिरवीगार शेती दिसून येईल तर एकीकडे, अगदी पाण्याचे दुर्भिक्षही आढळून येईल. याचमुळे विविधतेचे प्रतिबिंब उमटते. याच वैविध्यतेचे आणखी एक अनोखे उदाहरण म्हणजे आसाममधील एक गाव जिथे केवळ एकच कुटुंब उरले आहे.

आसाममधील या गावाचे नाव बर्धनारा-2 असे आहे. याच नावाशी साधर्म्य असणारे आणखी एक गाव आहे बर्धनारा-1. ही गावे आसाममधील नालबारी जिल्ह्यात येतात. अनेक वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या गावात एका रस्त्याचे उद्घाटन केले होते. तो रस्ताही आता गायब झाला आहे. आश्चर्य म्हणजे हा रस्ता या गावाला शहराशी जोडलेला होता. पण, आता तिथे फक्त कच्चे रस्ते बाकी राहिलेले आहेत.

काही दशकांपूर्वी या गावात अनेक लोक राहायचे. पण, 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार, बर्धनारा-2 गावात केवळ 16 लोक बाकी राहिले होते. आता तर ही संख्या यापेक्षाही कमी झाली आहे. काही वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावात आता एकाच कुटुंबाचे वास्तव्य आहे आणि त्या कुटुंबातही 5 सदस्यांचा समावेश आहे. या गावातील अनेक जण येथे शहराला जोडणारा रस्ताच नसल्याने कंटाळून येथून निघून गेले. आता जे 5 सदस्यांचे कुटुंब येथे राहतेय, त्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एक तरी या गावात शाळा नाही. त्यामुळे घरातील छोट्या मुलांना 2 किलोमीटर पायपीट करत शाळा गाठावी लागते. नजीकच्या पंचायतीला या गावाशी काही देणेघेणे वाटत नाही. त्यामुळे, ते ही पर्वा करत नाहीत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news