समुद्र किनार्‍यावरील गाव, 200 फुटांखाली शेती!

समुद्र किनार्‍यावरील गाव, 200 फुटांखाली शेती!

मनिला : पृथ्वीत अनेकाविध रहस्ये दडलेली आहेत. जर कोणी म्हटले की, श्वास रोखून दाखवा तर जास्तीत जास्त किती वेळ आपण असे करू शकतो? कमाल एक मिनीट, पण जगभरात अशीही जमात आहे, जे थोडेथोडके नव्हे तर 5 ते 13 मिनिटे श्वास रोखून धरू शकतात. इतकेच नव्हे तर या लोकांनी समुद्र किनार्‍यावर आपले गाव वसवले आहे आणि 200 फूट खोल पाण्यात ते शेती करतात!

समुद्र किनारी बस्तान मांडणारी ही फिलीपाईन्समधील बजाऊ जमात अवघ्या जगभरासाठी एक आश्चर्य ठरत आली आहे. या जमातीसाठी गुळगुळीत रस्ते, इंटरनेट, मोबाईलसारख्या मॉडर्न वस्तूंशी काहीही देणेघेणे नसते. ते आजही पारंपरिक पद्धतीनेच आपले जीवन व्यतित करतात.

बजाऊ जमात पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून सी-फूडच्या शोधात समुद्राच्या तळाशी पोहोचतात. वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीवर कमी आणि पाण्यात अधिक दिसून येतात. धक्कादायक बाब म्हणजे या जमातीच्या लोकांना फिलीपाईन्सच्या नागरिकांनी आपल्या क्षेत्रातून बाहेर काढले होते. त्यानंतर या जमातीने समुद्रकिनारी बस्तान मांडले. यातील काही जण टेंटसारख्या छोट्या ठिकाणी राहतात तर काही जण नावेतच आपला संसार मांडतात. अगदी त्यांची मुलेही नाव चालवण्यात आणि मासे पकडण्यात तरबेज असतात. या जमातीचे लोक समुद्रात उतरतात, त्यावेळीही त्यांचे पूर्ण डोळे उघडे असतात.

हे लोक मासे पकडण्यासाठी आजही भाल्याचा उपयोग करतात आणि याच आधारे समुद्राच्या तळातून अशा वस्तू बाहेर आणतात, ज्यांचा क्राफ्ट करण्यासाठीही विनियोग होऊ शकेल. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, त्यांची प्रतिकार शक्ती पृथ्वीवर राहणार्‍या अन्य लोकांच्या तुलनेत 50 टक्क्यांनी अधिक असते. मासे पकडण्यासाठी ते कोणत्याही ऑक्सिजन सिलिंडरशिवाय 200 फूट खोल समुद्रापर्यंत पोहोचतात आणि तेथे लपलेले मासे व अन्य समुद्री जीवांची शिकार भाल्याने करत त्यांना वर आणतात. यादरम्यान ते आपला श्वास 5 ते 13 मिनिटांपर्यंत रोखून धरतात.

संशोधनात असेही आढळून आले आहे की, त्यांच्या रेड ब्लड रिसायकल करणार्‍या प्लीहाचा आकार सामान्यांपेक्षा 50 टक्क्यांनी अधिक असतो. यामुळे एकदा ऑक्सिजन ओढल्यानंतर ते उशिरापर्यंत शरीरात ठेवून त्याचा वापर करू शकतात. जेव्हा एखादी व्यक्ती समुद्रात उडी घेते, त्यावेळी प्रेशर वाढण्याबरोबरच फुफ्फुसात अन्य दुष्परिणाम दिसू लागतात. मात्र, या लोकांबाबत तसे होताना दिसून येत नाही.

logo
Pudhari News
pudhari.news