Zealandia : ‘हा’ आहे पृथ्वीवरील आठवा खंड! | पुढारी

Zealandia : ‘हा’ आहे पृथ्वीवरील आठवा खंड!

वॉशिंग्टन : जगातील सात महाद्विपांची किंवा खंडांची माहिती आपल्याला असेलच; पण या पृथ्वीतलावर आठवा खंडही आहे याची अनेकांना कल्पना नसेल. त्याच्या अस्तित्वावर आता संशोधकांनी मोहोर उमटवली आहे. (Zealandia ) सुमारे 375 वर्षांच्या संशोधनानंतर आता या महाद्विपाचा शोध लागला आहे. त्याचे नाव ‘झियालँडिया’ असे असून तो समुद्राच्या पाण्याखाली दडलेला आहे!

या खंडाचा आकार सुमारे 18.9 लाख चौरस किलोमीटर आहे. तो एके काळी ‘गोंडवाना’ नावाच्या ‘सुपर काँटिनंट’चा म्हणजेच महाखंडाचा एक भाग होता. सुमारे 50 कोटी वर्षांपूर्वी गोंडवानामध्ये पश्चिम अंटार्क्टिका आणि पूर्व ऑस्ट्रेलियाचा भागही समाविष्ट होता.‘झियालँडिया’ सुमारे 10.5 कोटी वर्षांपूर्वी गोंडवानापासून वेगळा होऊ लागला. हे महाद्वीप का तुटले याचा संशोधक शोध घेत आहेत.

जसे जसे हे महाद्वीप तुटू लागले तसेच ‘झियालँडिया’चा भाग पाण्याखाली जाऊ लागला. त्याचा 94 टक्क्यांपेक्षाही अधिक भाग पाण्याखालीच आहे. झियालँडियाच्या अस्तित्वाबाबत सर्वात आधी सन 1642 मध्ये डच व्यापारी आणि नाविक एबेल तस्मान यांनी नोंद केली होती. ते ‘महान दक्षिणी महाद्विपा’च्या शोधासाठी बाहेर पडले होते.

अर्थात ते या भूमीचा शोध घेऊ शकले नाही व ते न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर जाऊन पोहोचले. त्यांचा सामना स्थानिक माओरी समुदायाच्या लोकांशी झाला. मात्र, शत्रुत्व असतानाही या लोकांनी त्यांना महत्त्वाची माहिती दिली. अर्थात वैज्ञानिकांना झियालँडियाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सुमारे 400 वर्षे लागली. 2017 मध्ये भूवैज्ञानिकांनी या खंडाच्या अस्तित्वाची अधिकृतपणे पुष्टी केली. या खंडाचा बहुतांश भाग पाण्याखाली आहे आणि दोन किलोमीटर खोल गेल्यावर त्याचा छडा लागतो.

हेही वाचा : 

Back to top button