Saweety Bora : बॉक्सर स्वीटी बोराचा ‘सुवर्ण’ पंच! जागतिक स्पर्धेत रचला इतिहास | पुढारी

Saweety Bora : बॉक्सर स्वीटी बोराचा ‘सुवर्ण’ पंच! जागतिक स्पर्धेत रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची स्टार बॉक्सर स्वीटी बोरा (saweety bora) हिने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरीची नोंद केली. तिने 81 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चीनच्या वांग लीनाचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्विटी ही जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची 7वी खेळाडू ठरली आहे.

शनिवारी भारताचे हे एकाच दिवसातील दुसरे सुवर्णपदक ठरले. तत्पूर्वी, नीतू घनघास (48 किलो) हिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत मंगोलियाच्या लुत्सैखान अल्तानसेतसेगचा पराभव करून भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. आता भारताच्या खात्यात दोन सुवर्णपदके जमा झाली आहेत.

स्वीटी बोराने (saweety bora) चीनच्या वांग लीनाचा 4-3 अशा फरकाने पराभव केला. या सामन्यात दोन्ही प्रतिस्पर्ध्यांची जबरदस्त चुरस पहायला मिळाली. पण अखेर भारतीय स्टारने एका गुणाच्या फरकाने बाजी मारली. तत्पूर्वी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीतू घांघासने 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मंगोलियाच्या लुत्सैखान अल्तानसेतसेगचा 5-0 अशा फरकाने पराभव केला.

या भारतीय खेळाडूंनी यापूर्वी जिंकले सुवर्णपदक

मेरी कोम (2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018), सरिता देवी (2006), जेनी आरएल (2006), लेखा केसी (2006), आणि निखत जरीन (2022) यांच्यानंतर नीतू घनघास, स्वीटी बोरा (saweety bora) यांनी भारतीय बॉक्सिंगमध्ये इतिहास रचला आहे.

भारताला आणखी 2 सुवर्ण जिंकण्याची संधी

अंतिम फेरीत निखतचा सामना दोन वेळचा आशियाई चॅम्पियन व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमशी होणार आहे. रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये लोव्हलिनाचा सामना ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करशी होईल. एकूणच या स्पर्धेत भारताला अजून दोन सुवर्णपदके मिळू शकतात.

Back to top button