Match Fixing Report : मॅच फिक्सिंगबाबत मोठे गुपित उघड! 2022 मध्ये 13 क्रिकेट सामने झाले फिक्स? | पुढारी

Match Fixing Report : मॅच फिक्सिंगबाबत मोठे गुपित उघड! 2022 मध्ये 13 क्रिकेट सामने झाले फिक्स?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Match Fixing Report : मागील वर्षी म्हणजे 2022 मध्ये जगभरात खेळल्या गेलेल्या काही क्रिकेट सामन्यांमध्ये फिक्सिंगचा संशय व्यक्त केला जात आहे. स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेसने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पुनरावलोकन अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, 2022 मध्ये खेळलेले गेलेले 13 क्रिकेट सामने भ्रष्टाचाराच्या कक्षेत आले आहेत.

स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिस युनिट (Match Fixing Report) ही तज्ञांची एक आंतरराष्ट्रीय टीम आहे जी अनियमित सट्टेबाजी, मॅच फिक्सिंग आणि खेळांमधील भ्रष्टाचाराच्या इतर प्रकारांचे विश्लेषण करते. या संस्थेने 2020 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) लाचलुचपत प्रतिबंधक युनिट (ACU) सोबतही काम केले आहे. सामन्यांदरम्यान संशयास्पद कृती शोधण्यासाठी ही संस्था युनिव्हर्सल फ्रॉड डिटेक्शन सिस्टम (UFDS) प्रणाली वापरते.

संस्थेने ‘2022 मधील सट्टेबाजी, भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंग’ नावाचा 32 पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, 2022 मध्ये 92 देशांमध्ये 12 खेळांचे 1212 सामने जे सामने आयोजित केले होते त्यात बेटिंग, फिक्सिंग झाले असल्याचे म्हटले आहे. (Match Fixing Report)

भ्रष्टाचार, फिक्सिंगमध्ये क्रिकेट सहाव्या स्थानावर

या अहवालानुसार फुटबॉल हा खेळ भ्रष्टाचारात आघाडीवर आहे. 2022 मध्ये 775 फुटबॉल सामन्यांमध्ये फिक्सिंग झाल्याचा संशय आहे. याबाबतीत बास्केटबॉल 220 सामन्यांसह दुसऱ्या तर लॉन टेनिस 75 सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर क्रिकेट सहाव्या स्थानावर आहे. केवळ 13 क्रिकेट सामन्यांमध्येच फिक्सिंगचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अहवालानुसार, संशयाच्या भोवऱ्यात असलेला एकही क्रिकेट सामना भारतात खेळला गेला नाही. स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेसच्या रेकॉर्डमध्ये एका वर्षात 13 क्रिकेट सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी कधीही इतक्या सामन्यांची नोंद झाली नव्हती.

युरोपमध्ये खेळले गेले सर्वाधिक संशयास्पद सामने

सामन्यांच्या ठिकाणानुसार 2022 मध्ये युरोप (630), आशिया (240), दक्षिण अमेरिका (225), आफ्रिका (93) आणि उत्तर अमेरिका (24) येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये फिक्सिंग झाल्याचा संशय आहे. 2021 च्या तुलनेत उत्तर अमेरिका आणि ओशनिया (ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, न्यूझीलंड, फिजी आणि इतर देश) वगळता प्रत्येक देशात संशयास्पद सामन्यांची संख्या वाढली आहे. टक्केवारीच्या दृष्टीने, सर्वात मोठी वाढ आफ्रिकेत (+82%) त्यानंतर दक्षिण अमेरिका (+72%) मध्ये झाली.

आयपीएलमधून 1200 कोटी रुपयांची उलाढाल

अहवालानुसार, भारतातील आयपील या क्रिकेट लिग स्पर्धेतून सट्टेबाज सुमारे 1200 कोटी रुपयांची कमाई करतात. जी जगातील सर्व लीगमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. यात आघाडीवर युईएफए चॅम्पियन्स लीग, इंग्लिश प्रीमियर लीग आणि नॅशनल फुटबॉल लीग आहे. फिक्सिंच्या बाबतीत क्रिकेट चौथ्या क्रमांकावर आहे. ज्यातून सुमारे 594.90 कोटींची बेटिंगमधून उलाढाल होते.

Back to top button