UFO : 2022 मधील उडत्या तबकड्यांचे ‘पेंटॅगॉन’लाही पडले कोडे! | पुढारी

UFO : 2022 मधील उडत्या तबकड्यांचे ‘पेंटॅगॉन’लाही पडले कोडे!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे लष्करी मुख्यालय ‘पेंटॅगॉन’कडून ‘युफो’ (UFO) म्हणजेच तथाकथित परग्रहवासीयांच्या ‘उडत्या तबकड्यां’बाबतच्या दाव्यांची शहानिशा करण्यात येत असते. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्येही ‘युफो’ पाहिल्याचे अनेक दावे विविध ठिकाणांहून करण्यात आले. त्यापैकी निम्म्या दाव्यांचे कोडे ‘पेंटॅगॉन’लाही सोडवता आलेले नाही. त्यांच्याबाबत निश्चित खुलासा करता येत नाही, असे ‘पेंटॅगॉन’ने म्हटले आहे.

‘पेंटॅगॉन’ने गुरुवारी म्हणजेच 12 जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या काही कागदपत्रांमध्ये याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हा अकरा पानांचा अहवाल डिरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स (ओडीएनआय) यांच्या कार्यालयाकडून बनवण्यात आला आहे. अमेरिकेत ‘युफो’ (UFO) (अनआयडेंटीफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स) म्हणजेच उडत्या तबकड्या पाहिल्याच्या किंवा ‘अनआयडेंटीफाईड एरियल फेनॉमेना’ (यूएपी) म्हणजेच आकाशातील अज्ञात घटनांच्या 510 दाव्यांची नोंद करण्यात आली होती. ही नोंद अमेरिकेच्या लष्करी अधिकार्‍यांनी केली होती.

त्यापैकी 366 घटना या 2022 मधील होत्या. अन्य 144 घटना 2004 ते 2017 दरम्यानच्या होत्या. नव्या 366 घटनांपैकी 195 घटनांचे कोडे उलगडण्यात यश आले आहे. या घटनांचा खुलासा करता येऊ शकतो. (UFO) त्यापैकी 26 प्रकरणे ही ड्रोनची, 163 प्रकरणे ही बलून्स किंवा बलूनसारख्या वस्तूंची आणि सहा प्रकरणे ही पक्षी किंवा आकाशातून उडणार्‍या प्लास्टिक बॅगसारख्या वस्तूंची होती. मात्र उर्वरित 171 प्रकरणांचे गूढ उकलण्यात यश आले नाही किंवा त्यांचे योग्य स्पष्टीकरण देता येत नाही. मात्र यामागे खरोखरच एलियन्स म्हणजेच परग्रहवासी असल्याचे स्पष्टपणे म्हटले गेलेले नाही.

हेही वाचा :  

Back to top button