कर्नाटकची दडपशाही न्यायालयाच्या निदर्शनास आणणार : धैर्यशील माने | पुढारी

कर्नाटकची दडपशाही न्यायालयाच्या निदर्शनास आणणार : धैर्यशील माने

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला जाण्यापासून आपल्याला रोखणार्‍या बेळगाव जिल्हाधिकार्‍यांची दडपशाही आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे खा. धैर्यशील माने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाला जाताना आपल्याला बंदी आदेश लागू करणे हा हक्कभंग असून, त्याबाबत आपण लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री व दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने सीमावादासंदर्भात नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्षपद आपल्याकडे आहे. या नात्याने आपल्याला बेळगावला होणार्‍या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. तेव्हा बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांनी या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून नेते येणार असतील तर त्याची माहिती द्या. म्हणजे आम्हाला त्यांना रितसर परवानगी देता येईल, असे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्‍यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी खा. माने येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रात्री दोन वाजता बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांनी 144 कलम लागू केले. प्रक्षोभक भाषण करणे, चिथावणी देणे यासाठी हे कलम लावले जाते. आपल्याकडून असे काही झाले नाही किंवा तशा प्रकारचा एकही गुन्हा आपल्यावर नाही. तरीही 144 कलम लागू करून आपल्याला बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांनी पाठविलेली नोटीस हा निंद्य प्रकार असल्याचे माने म्हणाले.

कोणत्याही व्यक्तीला कोठेही फिरण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी सुनावणी सुरू आहे. कर्नाटक सरकारची सुरू असलेली ही दडपशाही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही खा. माने यांनी सांगितले.

Back to top button