भारतीय नौदलातील 8 निवृत्त अधिकारी 129 दिवसांपासून कैद | पुढारी

भारतीय नौदलातील 8 निवृत्त अधिकारी 129 दिवसांपासून कैद

दोहा (कतार), वृत्तसंस्था : भारतीय नौदलातील 8 निवृत्त अधिकारी कतारमधील आपापल्या घरांत झोपलेले असताना 30 ऑगस्ट 2022 रोजी या सगळ्यांना कतारच्या गुप्तचर अधिकार्‍यांनी अटक केली व वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवले. या घटनेला 129 दिवस उलटूनही या अधिकार्‍यांची सुटका झालेली नाही. कतारशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असूनही कतार सरकारने या अधिकार्‍यांच्या अटकेचे साधे कारणही जाहीर केलेले नाही. त्यामुळे हा मामला गंभीर असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. हे अधिकारी इस्रायलसाठी कतारमध्ये हेरगिरी करत असल्याचेही बोलले जाते. हे अधिकारी कतारमधील संरक्षण सेवा क्षेत्रातील दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी या खासगी कंपनीत कार्यरत होते.

ओमान हवाई दलाचे निवृत्त स्क्वॉड्रन लीडर खामिस अल अजमिक हे या कंपनीचे प्रमुख आहेत. त्यांनाही अटक झाली होती, पण नोव्हेंबरमध्ये ते सुटले.

भारतीय दूतावासाला सप्टेंबरमध्ये भारतीयांच्या अटकेची माहिती मिळाली होती. 30 सप्टेंबर रोजी या अधिकार्‍यांना कुटुंबीयांसह काही काळ फोनवर बोलू दिले गेले होते. कतार सरकारने अजूनही या अधिकार्‍यांवर आरोप काय ते स्पष्ट केलेले नाही. त्यांच्या अटकेची व कैदेची तर्‍हा पाहाता सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यातच त्यांना अटक करण्यात आली आहे, हे स्पष्ट आहे. हे सगळे इस्रायलसाठी हेरगिरी करत असल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. दोहा न्यायालय या अधिकार्‍यांची न्यायालयीन कोठडीही सातत्याने वाढवत आहे.

Back to top button