cloves : मधुमेह, कोलेस्टेरॉलवर लवंग ठरू शकते गुणकारी | पुढारी

cloves : मधुमेह, कोलेस्टेरॉलवर लवंग ठरू शकते गुणकारी

नवी दिल्ली : हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार असोत किंवा ‘टाईप-2 मधुमेहा’सारखा चयापचय क्रियेशी संबंधित विकार असो, त्यांच्यावरील उपचारासाठी शरीरात नैसर्गिकरीत्याच आढळणारे अँटिऑक्सिडंटस् ग्लूटाथियोनचा स्तर वाढवणे ही एक प्रभावी पद्धत मानली जाते. मात्र, सिंथेटिक ग्लूटाथियोन अस्थिर आहे आणि जैविक उपलब्धताही मर्यादित आहे. अशा स्थितीत भारतीय मसाल्यांपैकी एक महत्त्वाचा घटक असलेली लवंग (cloves) चयापचय क्रियेशी संबंधित विकार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. एका नव्या संशोधनात आढळले आहे की शरीरातील नैसर्गिक ग्लूटाथियोनचा स्तर वाढवण्यासाठी लवंग प्रभावी ठरू शकते.

केरळच्या कोट्टयममधील सेंट थॉमस कॉलेजच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी लवंगेच्या जलीय अर्कातील सक्रिय घटक ‘क्लोविनॉल’च्या गुणधर्मांचा अभ्यास केला. या संशोधनात ग्लूटाथियोनचा स्तर वाढवण्यासाठी चयापचयाशी संबंधित विकारांनी ग्रस्त रुग्णांना दोन वेगवेगळ्या गटात विभागून त्यांना अनुक्रमे क्लोविनॉल आणि सिंथेटिक ग्लूटाथियोनची नियंत्रित मात्रा देण्यात आली.

त्यानंतर दोन्हीच्या प्रभावांचा अभ्यास करण्यात आला व त्यांची तुलना केली गेली. बारा आठवड्यांनंतर सहभागी रुग्णांनी दहा तासांचा उपवास केला आणि त्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये संशोधकांनी अँटिऑक्सिडंट परीक्षण किटच्या सहाय्याने अँटिऑक्सिडंटच्या मात्रेचे अनुमान लावले.

सिंथेटिक ग्लूटाथियोन घेणार्‍या समूहाच्या तुलनेत क्लोविनॉल कॅप्सूलचे सेवन करणार्‍या समूहामध्ये अँटिऑक्सिडंटचा स्तर लक्षणीयरीत्या वाढलेला दिसून आला. संशोधक रतीश मोहनन यांनी सांगितले की क्लोविनोल दिलेल्या रुग्णांमधील अँटिऑक्सिडंटचा स्तर दुसर्‍या समूहाच्या तुलनेत सुमारे 46 टक्के अधिक असल्याचे दिसून आले. असेही आढळून आले की रोज 250 मिलीग्रॅम क्लोविनॉलने एकूण कोलेस्टेरॉलचा स्तर लक्षणीयरीत्या कमी केला आणि रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित केले. हे क्लोविनॉल लवंगेत नैसर्गिकरीत्याच असते.

हेही वाचा :

Back to top button