PM Modi's mother Heeraben : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन अनंतात विलीन | पुढारी

PM Modi's mother Heeraben : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन अनंतात विलीन

गांधीनगर; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी (PM Modi’s mother Heeraben) यांचे आज शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता निधन झाले. त्यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज गांधीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत हिराबेन यांच्या पार्थिवाला पंतप्रधान मोदी यांनी खांदा दिला आणि अग्निसंस्कार पार पाडले.

गेल्या बुधवारी हिराबेन मोदी यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली. आज त्यांच्यावर गांधीनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आई हिराबेन मोदी यांना गांधीनगर येथील निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करतही आई हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली. ”एक गौरवशाली शंभर वर्षाचे आयुष्य ईश्वराच्या चरणी विसावले…आईमध्ये मला त्या त्रिमूर्तीची नेहमीच अनुभूती झाली, त्यांचा प्रवास एका तपस्वीसारखाच होता, निष्काम कर्मयोगीचे प्रतिक आणि मूल्यांशी बांधिलकी जपणारे जीवन त्यात सामावलेले आहे.” अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (PM Modi’s mother Heeraben

हिराबेन मोदी यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूज्य मातोश्री हिरा बा यांच्या स्वर्गवासाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आई एक अशी व्यक्ती आहे जी जीवनातील पहिली मित्र आणि गुरू असते. आईची छत्रछाया हरवणे हे या जगातील सर्वात मोठे दुःख आहे यात शंका नाही.

Back to top button