Perseverance Rover : पर्सिव्हरन्स रोव्हरने टिपला मंगळावरील वावटळीचा आवाज | पुढारी

Perseverance Rover : पर्सिव्हरन्स रोव्हरने टिपला मंगळावरील वावटळीचा आवाज

वॉशिंग्टनः मंगळावरही वारे वाहतात, तसेच वावटळी, वादळेही होतात; मात्र मंगळभूमीवरील वावटळींचा आवाज कसा असतो याबाबत संशोधकांनाही कुतूहल होते. आता ‘नासा’च्या ‘पर्सिव्हरन्स’(Perseverance Rover) या रोव्हरने लाल ग्रहावर उठलेल्या वावटळीचा आवाज रेकॉर्ड केला आहे. धुळीची ही वावटळ रोव्हरवरून उडत गेली होती. ‘नासा’ने म्हटले आहे की, त्यावेळी वार्‍याचा वेग तासी 40 किलोमीटर होता. एखाद्या रोव्हरने प्रथमच अशा प्रकारचा आवाज रेकॉर्ड केला आहे.

दहा सेकंदांच्या या रेकॉर्डिंगमध्ये रोव्हरला धडकत असलेल्या धुळीच्या शेकडो कणांचाही आवाज ऐकू येतो. मंगळभूमीवरील या वावटळी पृथ्वीवरील वावटळींसारखीच आहेत; मात्र मंगळावर शांतता आहे आणि वातावरण अधिक विरळ आहे. त्यामुळे ध्वनीही हलकाच ऐकू येतो. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ (Perseverance Rover) या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.

संशोधक नाओमी मर्डोक यांनी म्हटले आहे की, धुळीची ही वावटळ गेल्या वर्षीची आहे. (Perseverance Rover)ती अत्यंत वेगाने रोव्हरवरून गेली. त्यावेळी रोव्हरच्या कॅमेर्‍याने छायाचित्रे टिपली आणि अन्य उपकरणांनी बाकी डेटा गोळा केला. मंगळावर धुळीच्या वावटळी उठणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. आता ज्या वावटळीला रेकॉर्ड करण्यात आले आहे ती किमान 400 फूट लांब आणि 80 फूट रुंदीची होती. ती 16 फूट प्रतिसेकंद या वेगाने उडत होती.

हेही वाचा : 

Back to top button