जग कोरोनाच्या खाईत, वुहानमध्ये वॉटर पार्टी! | पुढारी

जग कोरोनाच्या खाईत, वुहानमध्ये वॉटर पार्टी!

वुहान : चीनच्या ज्या वुहान शहरातून जगभर कोरोनाचा फैलाव झाला तिथे सध्या आनंदीआनंद आहे. काही दिवसांपूर्वी वुहानच्या एका वॉटर पार्कमध्ये इलेक्ट्रॉनिक म्युझिक पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शेकडो चिनी मास्कशिवाय सहभागी झाले! या पार्टीचे फोटो व व्हिडीओ आता जगासमोर आले आहेत.

वुहानमधील माया बीच वॉटरपार्कमध्ये ही पार्टी झाली आणि त्यामध्ये स्विमसूट आणि डोळ्यांवर गॉगल घालून शेकडो लोक सहभागी झाले. ज्या वुहानमधून आलेल्या कोरोनाने सगळ्या जगाला मास्क घालावा लावला आहे तिथे मात्र सध्या असे शेकडो लोक मास्कशिवायच पाण्यात खेळण्याचा आनंद लुटत आहेत. सध्या जगभर लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागत असताना वुहानमधील या पार्टीत चिन्यांनी बेसुमार गर्दी केलेली दिसून येते. वुहानमधील या पार्टीची छायाचित्रे व व्हिडीओ सोशल मीडियात येताच अनेक लोकांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला. हेच ते वुहान आहे का, जिथे कोरोनाने एके काळी कहर केला होता? असा प्रश्‍न अनेकांना पडला. तेथील लोकांच्या निष्काळजीपणाबाबतही अनेकांनी काळजी व्यक्‍त केली. 76 दिवसांच्या लॉकडाऊननंतर वुहान शहरातील वॉटर पार्क जूनमध्येच खुली करण्यात आली होती.

Back to top button