भारतातही खासगी कंपनी अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी सज्ज | पुढारी

भारतातही खासगी कंपनी अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी सज्ज

नवी दिल्‍ली : अमेरिकेत एलन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही कंपनी ‘नासा’च्या साथीने अंतराळ संशोधन क्षेत्रात दमदार वाटचाल करीत असून या कंपनीने रॉकेट आणि अंतराळयानही बनवले आहेत. भारतातही आता एक खासगी कंपनी ‘इस्रो’च्या साथीने नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. एअरोस्पेस कंपनी ‘स्कायरूट’ भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’च्या मदतीने डिसेंबर 2021 पर्यंत अंतराळात आपले रॉकेट लाँच करणार आहे. 

सध्या देशात ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर वर्ल्ड’ चे वारे वाहत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ‘स्कायरूट’ने हे दमदार पाऊल उचलले आहे. ‘स्कायरूट’ने आपल्या पहिल्या लाँच व्हेईकलचे नाव ‘विक्रम-1’ असे ठेवले आहे. स्कायरूट एअरोस्पेस हा पहिला भारतीय स्टार्टअप आहे ज्याच्या माध्यमातून देशातील पहिले खासगी रॉकेट इंजिन ‘रमण’ची यशस्वी चाचणी झाली. रॉकेट इंजिन मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात. ते अनेक टप्प्यांमध्ये काम करतात व प्रत्येक टप्प्यासाठी वेगळे इंजिन जोडलेले असते. काही इंजिनमध्ये द्रवरूप इंधनाचा वापर केला जातो. इंजिनच्या मदतीनेच रॉकेट अवकाशात झेपावते. ‘स्कायरूट’ने रॉकेटच्या अपर स्टेज इंजिनची चाचणी घेतलेली आहे. भारतात प्रथमच खासगी क्षेत्रात उपग्रहांच्या लाँचिंगसाठी लिक्‍विड इंजिनची यशस्वी चाचणी झाली आहे. सर्व काही सुरळीत पार पडले तर डिसेंबर 2021 पर्यंत ‘इस्रो’च्या मार्गदर्शनाखाली रॉकेटचे मेडन लाँचही होईल. कंपनीने म्हटले आहे की सध्या तीन रॉकेटवर काम होत आहे. ‘इस्रो’चे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ या रॉकेटला ‘विक्रम1,2,3’ अशी नावे देण्यात आली आहेत. नोबल पुरस्कार विजेते सर सी.व्ही. रमण यांचे नाव इंजिनला देण्यात आले आहे.

Back to top button