स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी उपयुक्त | पुढारी | पुढारी

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी उपयुक्त | पुढारी

लंडन : अनेकांना छोट्या छोट्या गोष्टीही विसरण्याची जणू काही सवयच असते. अशा लोकांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारातील काही सुधारणा लाभदायक ठरू शकतात. भोपळ्याच्या बियांसारखे आहारातील काही पदार्थ यासाठी उपयुक्त ठरतात. आता ‘न्यूट्रिएंटस्’ या नियतकालिकात म्हटले आहे की स्ट्रॉबेरीचे सेवन यासाठी गुणकारी ठरू शकते.

रश युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे अध्ययन केले आहे. स्ट्रॉबेरीमध्ये फ्लॅवेनॉईड आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आढळते. हे दोन्ही ‘अँटी ऑक्सिडेटिव्ह’ म्हणून ओळखले जातात. ते फ्री रॅडिकल्सना चेतासंस्थेतील पेशींचे नुकसान करण्यापासून रोखतात. त्यामुळे उतारवयात स्मरणशक्ती कमजोर होण्याची समस्या राहत नाही. एकाच वेळी अनेक कामे करणे, योग्य-अयोग्य हे समजून घेणे तसेच निर्णयक्षमता यासाठी त्यांचा लाभ होतो. अल्झायमर्स व डिमेन्शियासारख्या उतारवयातील विस्मृतीशी संबंधित आजारांना रोखण्यासाठीही स्ट्रॉबेरी लाभदायक ठरते. पाहणीमध्ये आढळले की ज्या लोकांनी आठवड्यातून दोन ते तीनवेळा स्ट्रॉबेरी खाल्ली त्यांना या दोन्ही आजारांचा धोका 34 टक्क्यांनी कमी झाला. हृदयरोग व स्ट्रोकपासून वाचवण्यासाठीही स्ट्रॉबेरी गुणकारी आहे, असे यापूर्वी दिसून आले होते.

Back to top button