ऑनलाईन हनुमान चालिसा पठणाचा विश्‍वविक्रम | पुढारी | पुढारी

ऑनलाईन हनुमान चालिसा पठणाचा विश्‍वविक्रम | पुढारी

प्रयागराज ः

श्रीरामभक्‍त हनुमंताला ‘संकटमोचक’ म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे संत तुलसीदासांनी हनुमंताच्या स्तुतीसाठी लिहिलेल्या ‘हनुमान चालिसा’चे देश-विदेशात अनेक लोक पठण करतात. सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटाने त्रस्त आहे. अशावेळी हे संकट दूर व्हावे, यासाठी भाविकांनी हनुमान चालिसाचे पठण करण्याचे ठरवले. आता 60 देशांमधील एक लाख लोकांनी एकाच वेळी एकत्र ऑनलाईन हनुमान चालिसाचे पठण केले असून हा एक विश्‍वविक्रम झाला आहे.

प्रयागराजमधील लेटे हनुमान मंदिरातील महंत योगगुरू आनंद गिरी यांनी सांगितले की अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील सिलिकॉन आंध—ा या संस्थेने हनुमान चालिसाचे ऑनलाईन पठण करण्याची इच्छा व्यक्‍त केली. झूम अ‍ॅपमार्फत वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आले. जगातील साठ देशांमधील एक लाख लोकांना यासाठी जोडण्यात आले.

प्रयागराजहून स्वामी आनंद गिरीदेखील यामध्ये सहभागी होते. 15 ऑगस्टच्या रात्री साडेआठ वाजता हनुमान चालिसा आणि सुंदरकांडाचे पठण सुरू झाले व ते रात्री साडेबारापर्यंत सुरू होते. या अनोख्या हनुमान चालिसा पठणाने विश्‍वविक्रम केला व त्याची नोंद गिनिज बुकने घेतली. याबाबत गिनिज बुकने प्रमाणपत्र दिले आहे.


 

Back to top button