पृथ्वीजवळून गेला मोटारीच्या आकाराएवढा लघुग्रह | पुढारी

पृथ्वीजवळून गेला मोटारीच्या आकाराएवढा लघुग्रह

वॉशिंग्टन : एखाद्या कारइतक्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीपासून 1830 मैल अंतरावरून पुढे निघून गेला. याबाबतची माहिती अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दिली आहे. या लघुग्रहाचा पृथ्वीला कोणताही धोका नव्हता.

मंगळ आणि गुरू या ग्रहांदरम्यान लघुग्रहांचा एक पट्टा आहे. तेथील अनेक लघुग्रह वेळोवेळी पृथ्वीजवळून जात असतात. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवरून डायनासोरचे साम—ाज्य नष्ट झाले होते. अर्थात प्रत्येक वेळी पृथ्वीशी अशी लघुग्रहाची धडक होईलच असे नसते. मात्र, हा लघुग्रह पृथ्वीच्या अतिशय कमी अंतरावरून पुढे निघून गेला आहे. ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने याबाबतची माहिती दिली.

या लघुग्रहाचे नाव ‘2020 क्यूजी’ असे आहे. हा लघुग्रह कमी अंतरावरून गेला आहे आणि तो एखाद्या वेळेस पृथ्वीला धडकला जरी असता तरी त्यामुळे फारसे नुकसान झाले नसते असे संशोधकांनी म्हटले आहे. हा लघुग्रह तीन ते सहा मीटर लांबीचा होता. तो हिंदी महासागराच्या दक्षिण भागावरून रविवारी पुढे निघून गेला. त्यावेळी त्याचा वेग 8 मैल प्रतिसेकंद असा होता. पृथ्वीजवळून इतक्या आकाराचे लघुग्रह वेळोवेळी पुढे जात असतात. ते पृथ्वीच्या दिशेने आले तर पृथ्वीच्या वातावरणात जळून त्यांचे तुकडे होतात. 2013 मध्ये रशियाच्या चेल्याबिंस्कमध्येही असाच एक लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे 50 किलोमीटर उंचीवर जळून त्याचे तुकडे खाली कोसळले होते.

 

Back to top button