हत्तीच्या उंदराएवढ्या नातेवाईकाचा ५० वर्षांनी शोध | पुढारी

हत्तीच्या उंदराएवढ्या नातेवाईकाचा ५० वर्षांनी शोध

न्यूयॉर्क : छायाचित्रात उंदरासारखा दिसणारा चिमुरडा प्राणी जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी असलेल्या हत्तीचा नातेवाईक असल्याचे म्हटले तर आपल्या भुवया उंचावू शकतात. अर्थात मांजराला आपण मार्जारकुळातील वाघ, सिंहासारख्या प्राण्यांची ‘मावशी’ म्हणतो तसाच हा प्रकार आहे. हत्ती आणि या प्राण्यामध्ये केवळ एका गोष्टीत साम्य आहे व ते म्हणजे दोघांचे नाक. हत्तीची लांब सोंड म्हणजे त्याचे नाक असते व या प्राण्याचे नाकही सोंडेसारखे लांब असते. तब्बल 50 वर्षांनी हा प्राणी पुन्हा दिसून आला आहे.

आफ्रिकेत जिबौटी येथील खडकाळ भागात हा हाताच्या पंज्यात बसेल इतक्या आकाराचा सस्तन प्राणी दिसून आला. अर्धशतकानंतर त्याचा असा पुन्हा ‘शोध’ लागल्याने संशोधकांना आनंद झाला. या प्राण्याचे नाव आहे ‘सोमाली सेंगी’. त्याला ‘इलेफंटलस रीवोली’ असे शास्त्रीय नाव आहे. त्याच्या या नावातच हत्तीचा समावेश आहे. तिला इंग्रजीत ‘इलेफंट श्रू’ असे म्हटले जाते. अर्थात ती हत्तीही नाही की ‘श्रू’ म्हणजे चिचुंद्रीही नाही. ही सस्तन प्राण्यांची एक वेगळीच प्रजाती आहे ज्यांचे नाक लांब असते. सोमाली सेंगी 1973 पासून आढळली नव्हती. या प्राण्यांचे 39 नमुने उपलब्ध असून त्यावरूनच त्यांच्याबाबतची माहिती मिळालेली होती. मात्र, आता अनेक दशकांनंतर हा जिवंत प्राणी दिसून आला आहे.

Back to top button