पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्षांनी वाचवले बुडणार्‍या महिलांचे प्राण | पुढारी

पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्षांनी वाचवले बुडणार्‍या महिलांचे प्राण

लिस्बन : पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो यांनी वयाच्या 72 व्या वर्षी धाडस दाखवून समुद्रात बुडत असलेल्या दोन महिलांचे प्राण वाचवले. या महिलांची बोट उलटल्यानंतर त्या पाण्यात पडल्या होत्या. त्यावेळी मार्सेलो यांनी प्रसंगावधान दाखवून त्यांचे प्राण वाचवले. 

पोर्तुगालमधील अर्गारेव्ह समुद्रकिनार्‍यावर या दोन महिला बोट चालवत होत्या. किनार्‍यापासून काही अंतरावर त्यांची बोट उलटली व त्या पाण्यात पडल्या. या दोन्ही महिला बोटीला धरून जीव वाचवण्यासाठी धडपड करीत होत्या. राष्ट्राध्यक्ष रेबेलो हे त्यावेळी एका चित्रीकरणासाठी किनार्‍यावर आले होते. पर्यटनाला चालना मिळावी यासाठी ते हे चित्रीकरण करीत होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी चर्चा करून ते परतणार इतक्यात त्यांना या दोन महिला बुडत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने समुद्राकडे धाव घेतली. राष्ट्राध्यक्ष समुद्रात पोहत निघाल्याचे पाहून सर्व यंत्रणा सतर्क झाली व एक स्पीडबोट त्यांच्या दिशेने पुढे सरसावली. मार्सेलो या महिलांजवळ पोहोचून उलटलेल्या बोटीला पकडून राहा असे सांगत होते. त्यावेळी जवळ आलेल्या स्पीडबोटीत आधी या दोन महिलांना बसवून ते किनार्‍यावर परतले. या घटनेचा व्हिडीओही असून तो पाहून अनेक लोक त्यांचे कौतुक करीत आहेत.

Back to top button