जगातील अविस्मरणीय छायाचित्रे | पुढारी | पुढारी

जगातील अविस्मरणीय छायाचित्रे | पुढारी

जगभरात बुधवारी ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ साजरा करण्यात आला. दहा ओळींमधूनही जे नेमकेपणाने सांगता येणार नाही ते एका छायाचित्रामुळे शक्य होते. अनेक छायाचित्रे तर अतिशय बोलकी असतात. काही छायाचित्रांनी इतिहासात अढळ स्थान मिळवलेले आहे. जगातील अशाच काही गाजलेल्या छायाचित्रांची ही माहिती…

चंद्रावर पहिले पाऊल ः

नील आर्मस्ट्राँग यांनी चांद्रभूमीवर पहिले पाऊल ठेवले व हा क्षण इतिहासात अजरामर झाला. हे छायाचित्र जुलै 1969 मधील आहे. त्यावेळी तिथे एकच कॅमेरा होता. त्यामुळे नीलबरोबर अपोलो मोहिमेवर गेलेल्या एडविन ऑल्ड्रिन यांनी हे छायाचित्र टिपले. 

हिटलरसमोर न झुकणारा माणूस  ः 

हे छायाचित्र 13 जून 1936 चे आहे. ‘होर्स्ट वेसेल’ या शक्‍तिशाली जहाजाच्या लोकार्पणावेळी ते टिपले होते. त्यामध्ये उपस्थित सर्व लोक जर्मनीचा हुकुमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरला सलामी देत असताना दिसतात. केवळ एकच व्यक्‍ती हिटलरसमोर नतमस्तक झालेला नाही व त्याचे नाव आहे ऑगस्ट लँडमेसर. ऑगस्टने 1931 मध्ये हिटलरच्या नाझी पार्टीचे सदस्यत्व घेतले होते. मात्र, एका ज्यू मुलीशी साखरपुडा केल्याने त्याची हकालपट्टी झाली. 

पहिला अणुबॉम्ब ः

जगातील पहिल्या अणुबॉम्बचे हे छायाचित्र. अमेरिकेने ‘न्यू मेक्सिको’मध्ये हा ‘गॅझेट’ नावाचा अणुबॉम्ब विकसित केला होता. या मोहिमेचे नाव होते ‘ट्रिनिटी’. संशोधक जे. रॉबर्ट आयसेनहॉवर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने 16 जुलै 1945 मध्ये न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात आपली पहिली अणुचाचणी घेतली. हे छायाचित्र चाचणीच्या आधीचे आहे. या अणुबॉम्बचे वजन होते 21 किलो. तो 21 हजार टीएनटी स्फोटकांइतका धोकादायक होता. त्याचा स्फोट होताच 38 हजार लूट उंच धुराचे लोट उठले.

गोर्‍यांच्या शाळेत कृष्णवर्णीय ः

हे छायाचित्र डोरोथी काउंटस् नावाच्या तरुणीचे आहे. गोर्‍यांच्या शाळेत दाखला मिळवणारी ती पहिली कृष्णवर्णीय मुलगी होती. असा दाखला मिळणे जितके कठीण होते तितकेच कठीण गोर्‍यांच्या शाळेत टिकून राहणेही होते. 1957 मध्ये शेर्लेट हॅरी हार्डिंग हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर तिला गोर्‍या विद्यार्थ्यांनी सतत हिणवले, चिडवले; पण तिने हार मानली नाही. पुढे ती अमेरिकेतील नागरी हक्‍कांचा सशक्‍त चेहरा बनली. 

अंतराळात गेलेली श्‍वान ः

हे छायाचित्र ‘लायका’ नावाच्या श्‍वान मादीचे आहे. अंतराळात गेलेला हा पहिलाच प्राणी होता. 3 नोव्हेंबर 1947 मध्ये तिला ‘स्पुटनिक-2’ यानात एका विशेष खुर्चीत बांधून अंतराळात पाठवण्यात आले. त्यामधून तिने पृथ्वीची एक प्रदक्षिणाही केली. अंतराळात मानवाला पाठवणे किती सुरक्षित आहे हे पाहण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. दुर्दैवाने यानाचे तापमान सामान्यापेक्षा अधिक झाल्याने लायकाचा मृत्यू झाला व ती कधीच परत येऊ शकली नाही.

‘टायटॅनिक’ मधून वाचलेले लोक ः

हे छायाचित्र एप्रिल 1912 चे आहे. कार्पोथिया नावाच्या जहाजात टायटॅनिकच्या दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांना चढवले जात असताना ते टिपले होते. 1912 मध्ये जगातील सर्वात मोठे स्टीम इंजिनचे जहाज टायटॅनिक आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चार दिवसांच्या प्रवासानंतर हिमनगाला धडकून अटलांटिक महासागरात बुडाले. त्यामधील प्रवाशांना वाचवण्यासाठी ‘कार्पेथिया’ तिथे पाठवण्यात आले होते. या दुर्घटनेत 2223 लोकांपैकी 1517 जणांचा मृत्यू झाला.

नॉर्वेत पहिल्यांदा आली केळी ः

हे छायाचित्र 1905 मध्ये टिपले आहे. त्यावेळी पहिल्यांदाच नॉर्वेमध्ये केळ नावाचे फळ पोहोचले होते! नॉर्वे हा युरोपमधील दुसरा असा देश होता ज्याने केळांची आयात केली होती. त्यावेळी 3 हजार किलो केळींची खेप आली. तेथील लोकांसाठी हे मौल्यवान फळ होते! पोर्तुगिज व्यापारी उत्तर आफ्रिकेतून केळी आणून युरोपमध्ये विकत होते. 

अविस्मरणीय पोज ः

हॉलीवूडची सौंदर्यवती मदनिका मर्लिन मन्रोचे उडत्या स्कर्टचे छायाचित्र आजही लोकप्रिय आहे. 15 सप्टेंबर 1954 मध्ये एका सब-वे वर हे छायाचित्र टिपण्यात आले. तिथे एका लोखंडाच्या जाळीवर ती उभी होती. अनाथाश्रमात वाढलेल्या मर्लिनने आपले सौंदर्य व उत्स्फूर्त अभिनय यामुळे हॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले होते. एकेकाळी लाजाळू स्वभाव असलेली मर्लिन नंतर तिच्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाऊ लागली.

 

Back to top button