चॉकलेट, दुधापासून बनवल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती | पुढारी

चॉकलेट, दुधापासून बनवल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

इंदूर : विघ्नहर्त्या श्री गणेशाचे देशभर शनिवारी शुभागमन होत आहे. सध्या जगावर कोरोनाचे महाभयानक विघ्न आलेले आहे. त्याचे लवकरात लवकर निराकरण व्हावे अशीच तमाम भक्‍तांची इच्छा आहे. सुखकर्त्या, दुःखहर्त्या बाप्पाची त्यासाठी यंदा अधिकच मनोभावे पूजाअर्चा केली जाईल. त्याबरोबरच मूर्तींचा आकार आटोपशीर ठेवणे, गर्दी न करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे वगैरे गोष्टी तर आहेतच. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींबाबत यंदा अधिकच जागृती दिसून येत आहे. इंदूरमधील एका महिलेने अशाच इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनवल्या आहेत. त्यासाठी तिने चॉकलेट व दुधाचा वापर केला आहे.

या महिलेने आपली थीम ‘कोरोना वॉरियर्स’ अशी ठरवलेली आहे. कोरोना योद्ध्यांना यामधून मानवंदना देण्यात आली आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस वगैरे कोरोना योद्ध्यांना यामध्ये दर्शवण्यात आले आहे. निधी शर्मा असे या महिलेचे नाव आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादने लवकरच कोरोनाचे संकट दूर होईल असा विश्‍वास त्यांना आहे. त्यामुळे कोरोनाचा त्रिशुळाने वध करणारा गणेश त्यांनी यामधून दर्शवला आहे. कोरोनाच्या रूपातील गोळाही चॉकलेटचाच आहे हे विशेष! आपले नातेवाईक व मित्रमैत्रिणी यांच्यासाठी त्यांनी या मूर्ती बनवल्या आहेत. दुधात चॉकलेट मिसळून या मूर्ती त्यांनी बनवल्या. कोरोना महामारीबाबत जनजागृती करण्याचाही त्यांनी यामधून प्रयत्न केला आहे.

Back to top button