रामानुजाचार्यांची 216 फूट उंच, अष्टधातूची मूर्ती स्थापित | पुढारी

रामानुजाचार्यांची 216 फूट उंच, अष्टधातूची मूर्ती स्थापित

हैदराबाद ः

तामिळनाडूतील श्रीरंगमच्या रंगनाथस्वामी मंदिराची दोन मोठी वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे हे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे व दुसरे म्हणजे याच ठिकाणी विशिष्टाद्वैत मताचा पुरस्कार करणारे श्री संप्रदायातील महान आचार्य श्री रामानुजाचार्य यांचा सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचा पार्थिव देह आजही जतन करून ठेवलेला आहे. आता हैदराबादपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर रामनगर येथे रामानुजाचार्यांचे एक मंदिर उभे केले जात आहे. या मंदिरावर त्यांची अष्टधातूची तब्बल 216 फूट उंचीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. दुसरी मूर्ती मंदिराच्या गर्भगृहामध्ये ठेवली जाणार असून ती 120 किलो सोन्याची असेल.

रामानुजाचार्यांच्या जन्माला आता एक हजार वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांचा जन्म सन 1017  मध्ये झाला व सन 1137 मध्ये त्यांनी देहत्याग केला. त्यांनी सामाजिक समतेचा नेहमीच पुरस्कार केला. त्यामुळे त्यांच्या या भव्य मूर्तीला ‘स्टॅच्यू ऑफ इक्‍वॅलिटी’ असे नाव देण्यात आले आहे. या मंदिराचे काम 2014 मध्ये सुरू करण्यात आले होते. तेथील रामानुजाचार्यांची प्रतिमा बनवण्यासाठी 400 कोटी रुपये खर्च आला. या मंदिरासाठी जगभरातून देणग्या आलेल्या आहेत. येथील मूर्ती ही अष्टधातूपासून बनवलेली जगातील सर्वात मोठी मूर्ती ठरली आहे.

याबाबत तिच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्येही करण्यात आली आहे. मंदिराचे संस्थापक चिन्‍ना जियार स्वामी यांनी सांगितले की रामानुजाचार्य पृथ्वीतलावर 120 वर्षे राहिले. त्यामुळे गर्भगृहात 120 किलो सोन्याची मूर्ती स्थापित केली जाईल. संपूर्ण मंदिर 45 एकर जागेत उभे केले जात आहे. मंदिराचे मुख्य भवन दीड लाख चौरस फूट जागेत असेल. मंदिराची उंची 58 फूट आहे.

 

Back to top button