डुकराच्या शरीरात यकृत केले विकसित | पुढारी

डुकराच्या शरीरात यकृत केले विकसित

वॉशिंग्टन ः

अमेरिकन संशोधकांनी डुकराच्या शरीरात यकृत विकसित करण्यात यश मिळवले आहे. लवकरच असे मनुष्याबाबतही घडू शकते असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासणार नाही. 

पिटस्बर्ग युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी सहा डुकरांसाठी ‘लिम्फ नोड’मध्ये पूर्ण आकाराचे यकृत विकसित केले आहे. चाचणीवेळी असे दिसून आले की जर एखाद्या प्राण्यामध्ये एक भाग आजारामुळे खराब होऊ लागला तरी दुसरा भाग निरोगी राहू शकतो. त्याचे शरीर दुसरा अवयव तयार करू शकतो. यकृतामध्ये स्वतःला विकसित करण्याची क्षमता असते. त्याचा एक हिस्सा जर प्रत्यारोपित करण्यात आला तर तो एका पूर्ण यकृतामध्ये विकसित होऊ शकतो. शरीरातील लिम्फ नोडमध्ये यकृताच्या पेशी विकसित केल्या जाऊ शकतात. या पेशी मिळून आपली संख्या वाढवतात आणि एक पूर्ण यकृत तयार करतात.

यकृत निकामी झालेल्या सहा डुकरांवर याबाबतचे प्रयोग करण्यात आले. त्यांचा रक्‍तप्रवाहही वळवण्यात आला. शरीरातील आजारी यकृताच्या पेशींचा एक हिस्सा घेण्यात आला. त्यांना ‘हिपॅटोसायटस’ असेही म्हटले जाते.

या पेशींना डुकराच्या लिम्फ नोडमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. वैज्ञानिक डॉ. एरिक लागेस यांनी सांगितले की जर हिपॅटोसायटसला योग्य ठिकाणी पोहोचवले तर हे नवे यकृत विकसित होऊ शकते. सर्वसाधारणपणे छोट्या-मोठ्या गोष्टींची डागडुजी यकृत स्वतःच नैसर्गिकरीत्या करीत असते. डुकरांच्या शरीरात विकसित झालेले नवे यकृत खराब झालेल्या यकृतापेक्षा अधिक मोठे व सुविकसित होते. असाच एक प्रयोग उंदरांवरही करण्यात आला होता व तोही यशस्वी झाला होता.

 

Back to top button