जगातील सर्वात मोठे रूफटॉप ग्रीन हाऊस | पुढारी

जगातील सर्वात मोठे रूफटॉप ग्रीन हाऊस

टोरांटो :

बाग किंवा शेती केवळ जमिनीवरच केली जाते असे नाही. सध्या शहरांमध्ये काँक्रिटचे जंगलच असल्याने यासाठी जमीन शिल्‍लकही राहिलेली नाही. अशा काळात इमारतींच्या छतावरच बाग किंवा शेतीही केली जाऊ लागली आहे. कॅनडातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या माँट्रियलमध्ये एका इमारतीच्या छतावर जगातील सर्वात मोठे ‘रूफटॉप ग्रीन हाऊस’ आहे. तिथे सेंद्रिय भाज्यांचे उत्पादन घेतले जाते.

‘लूफा फार्म’ नावाच्या कंपनीने हे ग्रीनहाऊस बनवले आहे. येथील वेगवेगळ्या पालेभाज्या व फळभाज्या माफक दरामध्ये स्थानिक लोकांना उपलब्ध करून दिल्या जातील असे कंपनीने म्हटले आहे. हे रूफटॉप ग्रीनहाऊस 15 हजार चौरस मीटर जागेत आहे. दोन फुटबॉल मैदानांइतकी ही जागा आहे. लूफा फार्म कंपनीने अशाच प्रकारचे पहिले ग्रीनहाऊस 2011 मध्ये बनवले होते. कंपनीने आतापर्यंत न्यूयॉर्क, शिकागो आणि डेनवरमध्ये असे आठ ग्रीनहाऊस बनवले आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्येही असे ग्रीनहाऊस बनवण्याचा कंपनीचा विचार आहे. याठिकाणी शंभरपेक्षा अधिक प्रकारच्या भाज्या व वनौषधींचे हायड्रोफोनिक कंटेनरमध्ये उत्पादन घेतले जाते. कंटेनरमध्ये चारही बाजूंनी नारळाचा चोथा घातला जातो. कंटेनरच्या आत द्रवरुप पोषक घटक असतात. त्यामुळे भाज्यांना पोषण मिळून त्यांचा चांगला विकास होतो.

Back to top button