समुद्रकिनारी सापडलेल्या बाटल्यांचे संग्रहालय | पुढारी | पुढारी

समुद्रकिनारी सापडलेल्या बाटल्यांचे संग्रहालय | पुढारी

क्वालालंपूर : अनेकांना काही ना काही छंद असतात. कुणी टपाल तिकिटे गोळा करते तर कुणी टेडी बियरच्या बाहुल्या, कुणी दुर्मीळ वस्तू गोळा करतात तर कुणी अनोखे दगड. मलेशियातील एका आजोबांना समुद्रकिनारी पडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या गोळा करण्याचा छंद आहे. अर्थात त्यांचा हा छंद पर्यावरणाचे जतन करणाराच आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून टेंगकू मोहम्मद अली मन्सूर यांनी मलेशियाच्या अनेक ठिकाणच्या किनार्‍यांवरून अशा बाटल्या गोळा करून त्यांचे एक सुंदर संग्रहालय उभे केले आहे.

मन्सूर यांनी दक्षिण चीन समुद्र पट्ट्यातील किनार्‍यांवरील नऊ हजार काचेच्या बाटल्या गोळा केलेल्या आहेत. त्याचे आपल्या लाकडी घरातच त्यांनी एक संग्रहालय बनवले आहे. या बाटल्या वेगवेगळ्या रंगांच्या, आकाराच्या आणि जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून वाहत आलेल्या आहेत. यापैकी दोन बाटल्यांमध्ये चिठ्ठ्याही सापडल्याचे ते सांगतात. यापैकी एका चिठ्ठीमध्ये हृदयाचे चित्र आणि चिनी अक्षरं होती तर दुसर्‍या बाटलीतील कागद खराब झाल्याने मजकूर वाचता आला नाही. मुळात समुद्रकिनारे स्वच्छ राहावेत या हेतूने त्यांनी बाटल्या गोळा करण्यास सुरुवात केली होती व नंतर त्यांचा हा छंदच बनला. काचेच्या फुटलेल्या बाटल्यांमुळे पर्यटकांच्या पायांना इजा होऊ नये असाही त्यांचा हेतू होता. हळूहळू या बाटल्यांचा संग्रह वाढू लागला आणि हे संग्रहालय उभे राहिले.

Back to top button