करिना चाळिशीत! | पुढारी | पुढारी

करिना चाळिशीत! | पुढारी

मुंबई : सन 2000 मध्ये ‘रिफ्युजी’मधून पदार्पण केलेल्या करिना कपूरने आता बॉलीवूडमधील वीस वर्षे आणि वयाची चाळीस वर्षे पूर्ण केली आहेत. कपूर घराण्याचा नावलौकिक व परंपरा राखत एक यशस्वी अभिनेत्री ठरलेल्या करिनाने सोमवारी आपला चाळिसावा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने सोशल मीडियातून आपल्या चाहत्यांसमोर भावनाही व्यक्‍त केल्या.

तिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट लिहिली असून त्यासह आपला एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. तिने लिहिले आहे, मी वयाच्या चाळिशीत पदार्पण करीत आहे. मला खूप प्रेम करायचे आहे, हसायचे आहे, माफ करायचे आहे, वाईट गोष्टी विसरायच्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परमेश्‍वराकडे प्रार्थना करायची आहे. मला ताकद देणार्‍यांचे आभार मानायचे आहेत आणि आज मी जशी आहे तशी महिला बनवणारे माझे अनुभव व विचार यांचीही मी आभारी आहे. त्यापैकी काही योग्य, काही अयोग्य, काही खूप चांगले व काही चांगलेही नव्हते; पण तरी हे ‘बिग 40’ आणखी ‘बिग’ करूया!’ 21 सप्टेंबर 1980 मध्ये जन्मलेल्या करिनाला तिचे आजोबा राज कपूर यांनी ‘सिद्धीमा’ असे नाव दिले होते. (ऋषी कपूर यांच्या मुलीचे नाव रिद्धीमा आहे!) मात्र करिनाची आई बबिता यांनी आपल्या गरोदरपणात ‘कॅरेनिना’ हे पुस्तक वाचले होते व त्यावरून त्यांनी या धाकट्या लेकीचे नाव ‘करिना’ ठेवले! शाहरूख, सलमान, आमीर, सैफ आणि इरफान अशा पाच बड्या खानांबरोबर काम करणारी ती एकमेव कलाकार आहे. ‘जब वुई मेट’सारख्या अनेक चित्रपटांमधून तिने आपला उत्स्फूर्त अभिनय दर्शवला आहे.

Back to top button