अयोध्येत आज होणार दीपोत्सवाचा विश्वविक्रम | पुढारी

अयोध्येत आज होणार दीपोत्सवाचा विश्वविक्रम

अयोध्या : भगवान श्रीरामाच्या वास्तव्याने पुनीत झालेली मोक्षनगरी अयोध्येत शुक्रवारी 13 नोव्हेंबरला दीपोत्सवाचा नवा विश्वविक्रम होईल. श्रीराम जन्मभूमीवरील भव्य श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानंतर आता यावर्षीची दिवाळी अयोध्यावासीयांसाठी अधिकच खास बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर जन्मभूमी, राम की पैडी, शरयूच्या काठावर लाखो दिवे लावले जातील व हा विश्वविक्रम होईल.

विजयादशमीला म्हणजेच दसर्‍याला रावणाचा वध करून भगवान श्रीराम, सीतादेवी व लक्ष्मण अयोध्येला परत आल्यावर अयोध्यावासीयांनी दीपोत्सव करून दिवाळी साजरी केली होती असे मानले जाते. त्यामुळे अयोध्येसाठी दिवाळीचे विशेष महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांपासून अयोध्येत भव्य दीपोत्सव व अनेक कार्यक्रम करून दिवाळी साजरी होत आहे. यावर्षी बुधवारपासूनच अयोध्येत दीपोत्सवास प्रारंभ झाला आहे. ‘राम की पैडी’ येथे शुक्रवारी दीपोत्सव होईल. राम जन्मभूमी परिसरात प्रथमच अकरा हजारांपेक्षाही अधिक दिवे लावून या परिसरात झगमगाट केला जाईल. ‘राम की पैडी’ येथे साडेपाच लाख दिवे लावून विश्वविक्रम करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर 11 नोव्हेंबरपासूनच अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. दीपोत्सवात रामायणातील प्रसंगांवर आधारित अकरा देखावेही सादर केले जातील.

 

Back to top button