जगाला वेगवान इंटरनेट देण्यासाठी ‘स्टारलिंक’ व ‘गुगल’ची हातमिळवणी | पुढारी

जगाला वेगवान इंटरनेट देण्यासाठी ‘स्टारलिंक’ व ‘गुगल’ची हातमिळवणी

न्यूयॉर्क : इलेक्ट्रिक कार बनवणार्‍या ‘टेस्ला’ कंपनीचे सीईओ एलन मस्क हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. शेकडो उपग्रहांचे एक जाळे निर्माण करून त्या माध्यमातून इंटरनेट सेवा देण्यासाठीही त्यांनी ‘स्टारलिंक’ योजना सुरू केलेली आहे. आता कंपनीने यासाठी ‘गुगल’शीही हातमिळवणी केली आहे.

‘स्टारलिंक’ने भारतात फेब—ुवारीमध्येच हायस्पीड इंटरनेट सर्व्हिससाठी प्री-बुकिंग सुरू केले आहे. आता कंपनीने ‘गुगल’शी पार्टनरशीप केल्याने या कामात वेग येऊ शकतो. जगातील कोणत्याही कानाकोपर्‍यात स्वस्त आणि वेगवान इंटरनेट देण्यासाठी ‘स्टारलिंक’ची योजना आहे. स्टारलिंकचे जगभरात दहा हजारपेक्षाही अधिक अ‍ॅक्टिव्ह यूजर्स असल्याचा दावा केला जातो. ‘गुगल’चे हाय कपॅसिटी प्रायव्हेट नेटवर्क स्टारलिंकच्या ग्लोबल सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिसला सपोर्ट करते. त्यामुळे कस्टमरला कोणत्याही अडथळ्याशिवाय हायस्पीड इंटरनेट मिळू शकेल. यामध्ये ग्लोबल ऑर्गनायझेशनची मागणीही आहे. 1500 स्टारलिंक सॅटेलाईटस्ना गुगल क्लाऊडच्या कक्षेत लाँच करण्यात आले आहे.

‘स्पेसएक्स’ने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की सध्याच्या काळात जगभरातील बहुतांश लोक घरातूनच काम करीत आहेत. तसेच विद्यार्थी व्हर्च्युअल लर्निंग (ऑनलाईन शिक्षण) घेत आहेत. त्यामुळे अशा काळात इंटरनेट कनेक्टिव्हिटी अधिकच महत्त्वाची ठरली आहे. स्टारलिंकचे सॅटेलाईटस् अन्य उपग्रहांच्या तुलनेत पृथ्वीच्या साठपट अधिक जवळ आहेत. भारतात स्टारलिंक इंटरनेट 2022 मध्ये सुरू होईल असे म्हटले जाते. सध्या सर्व्हिस चाचण्यांच्या टप्प्यात आहे.

Back to top button