चमकणारे स्क्‍वीड, टार्डिग्रेडस् जाणार अंतराळात ! | पुढारी

चमकणारे स्क्‍वीड, टार्डिग्रेडस् जाणार अंतराळात !

न्यूयॉर्क ः रशियाने अंतराळात कुत्री पाठवून एकेकाळी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतरच्या काळात प्रयोगांसाठी अनेक प्रकारचे जीव अंतराळात पाठवण्यात आलेले आहेत. आता ‘नासा’ने आठ पायांचे सूक्ष्म जीव ‘टार्डिग्रेडस्’ तसेच अंधारात चमकणारे बेबी स्क्‍वीड हे प्राणी अंतराळात पाठवण्याची तयारी केली आहे. 

टार्डिग्रेडना ‘पाण्यातील सूक्ष्म अस्वलं’ असे म्हटले जाते. अस्वलांसारखा आकार असलेले असे पाच हजार सूक्ष्म जीव अंतराळात पाठवले जाणार आहेत. पुढील आठवड्यात ‘स्पेस एक्स’च्या 22 व्या मालवाहतूक करणार्‍या यानाच्या मोहिमेतून हे जीव पृथ्वीच्या कक्षेत भ—मण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना होतील. ‘फाल्कन 9’ या रॉकेटच्या सहाय्याने फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून या जीवांना रवाना केले जाईल. टार्डिग्रेड हा अवघा एक मिलीमीटर लांबीचा सूक्ष्म जीव आहे. सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यावर त्याचा अनोखा अस्वलासारखा आकार दिसून येतो व त्यामुळेच त्यांना ‘टार्डिग्रेड’ हे नाव देण्यात आले आहे. अत्यंत दुर्गम स्थितीतही तग धरून राहण्यासाठी हे जीव प्रसिद्ध आहेत. महासागरांमध्ये अत्यंत खोल ठिकाणीही हे जीव आरामात राहतात. अतिशय किरणोत्सारी ठिकाणी तसेच महासागरातील अतिशय दाब असलेल्या खोल ठिकाणी तसेच अंतराळाच्या पोकळीतही हे जीव जिवंत राहतात. त्यांच्यासमवेतच ‘बेबी बॉबटेल स्क्‍वीड’ही अंतराळात पाठवले जाणार आहेत. तीन मिलीमीटर लांबीच्या या स्क्‍वीडमध्ये प्रकाश निर्माण करणारा अवयव असतो. त्यामुळे ते रात्रीच्या अंधारात चमकतात. 

Back to top button