सूर्यापासून निघाले लाखो टन तप्त वायू | पुढारी

सूर्यापासून निघाले लाखो टन तप्त वायू

वॉशिंग्टन ः सध्या अवघे जग कोरोना महामारीशी झुंजत आहे. अशा वेळीच आणखी एक संकट पृथ्वीच्या दिशेने येऊ घातले आहे. अर्थात त्याचे परिणाम आताच दिसून येणार नसले तरी भविष्यात अनेकप्रकारे जाणवू शकतात. हे संकट आहे ‘सुपर हॉट गॅसेस’ म्हणजेच अतितप्त वायूंचे. संशोधकांनी म्हटले आहे की सूर्याच्या पृष्ठभागापासून लाखो टन सुपर हॉट गॅसेस उत्सर्जित झाले आहेत व ते पृथ्वीच्या दिशेने सरकत आहेत.

या घटनेला अधिकृतपणे ‘कोरोनल मास इजेक्शन’ असे म्हटले जाते. संशोधकांनी म्हटले आहे की काही दिवसांपूर्वीच उत्सर्जित झालेले हे वायू पृथ्वीचे गंभीर स्वरूपात नुकसान करण्याइतके सक्षम नसले तरी त्यांच्यामुळे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली भू-चुंबकीय वादळे किंवा सौरवादळे निर्माण होऊ शकतात. अनेक वर्षांच्या निष्क्रियतेनंतर सूर्य जणू काही जागा झालेला आहे. 

त्याच्यापासून निघालेले हे वायू प्रत्यक्षरूपाने हानिकारक ठरत नाहीत. मात्र, त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या सौरवादळांचा परिणाम पॉवर ग्रीड आणि रेडिओ संचार यंत्रणेवर होत असतो. कृत्रिम उपग्रहांच्या कार्यात यामुळे अडथळे निर्माण होत असतात. तसेच घातक विकिरणांचा धोकाही संभवत असतो. गेल्यावर्षी म्हणजेच 2020 मध्ये सूर्याने आपले अकरा वर्षांचे नवे चक्र सुरू केले आहे. ते 2025 पर्यंत आपल्या शिखरावर पोहोचेल. त्यामुळे भविष्यात अशा सौरवादळांचे संकट वाढू शकते.

Back to top button