मंगळावर पृथ्वीप्रमाणेच ज्वालामुखीचा खडक! | पुढारी | पुढारी

मंगळावर पृथ्वीप्रमाणेच ज्वालामुखीचा खडक! | पुढारी

वॉशिंग्टन ः अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे की पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळभूमीवर पृथ्वीवर आढळणार्‍या ज्वालामुखीच्या खडकांसारखाच एक खडक शोधला आहे. हे रोव्हर या मोठ्या आकाराच्या खडकाजवळून गेले होते. या खडकात पृथ्वीवर आढळणार्‍या खडकांशी बर्‍याच अंशी साम्य आहे. 

हे रोव्हर मंगळावर अशा खडकांना शोधत आहे ज्यांच्यामध्ये अनेक स्तर असतात. तसेच त्यामध्ये जीवसृष्टीचे काही संकेत मिळतात का हेही पाहिले जात आहे. या रोव्हरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून काही दिवसांपूर्वी रोव्हरच्या मार्गाचीही माहिती देण्यात आली होती. या मार्गावरून जात हे रोव्हर मंगळावरील जीवसृष्टीचे पुरावे शोधत आहे. एके काळी जिथे नदी होती असे मानले जाते, त्या भागात हे रोव्हर संशोधन करीत आहे. पर्सिव्हरन्स 18 फेब—ुवारी 2021 या दिवशी यशस्वीरीत्या मंगळभूमीवर उतरले आहे. जेजीरो नावाच्या क्रेटरमध्ये उतरलेले हे रोव्हर अनेक बाबतीत संशोधन करीत आहे. यापूर्वी ‘नासा’ने ‘फिनिक्स’, ‘विकिंग-1’,‘विकिंग-2’, पाथफाईंडर, अपॉर्च्युनिटी, इनसाईट, क्युरिऑसिटी, स्पिरिट हे रोव्हरही उतरवलेले आहेत. ‘पर्सिव्हरन्स’ बरोबरच ‘नासा’ने ‘इंज्युनिटी’ हे दोन किलो वजनाचे छोटे हेलिकॉप्टरही मंगळभूमीवर उतरवले आहे.

Back to top button